IND vs AUS 3rd Test Day 3: सिडनी (Sydney) येथील भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 338 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाला (Team India) पहिल्या डावात 244 धावांपर्यंत मजल मारू शकला. अशाप्रकारे दुसऱ्या डावात फलंदाजी करत कांगारू संघाने दिवसाखेर 197 धावांची आघाडी घेतली आहे. शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांना वगळता अन्य फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी बजावली. रवींद्र जडेजा 28 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, दुसऱ्या डावात दुखापतीतून पुनरागमन करणारा डेविड वॉर्नर (David Warner) पुन्हा एकदा अपयशी ठरला. पहिल्या डावात 5 धावा करणारा वॉर्नर दुसऱ्या डावात 13 धावाच करू शकला. सिडनी हे वॉर्नरचे होम ग्राउंड असून 6 वर्षात पहिल्यांदा या मैदानावर तो प्रभावी खेळी करत अपयशी ठरला आहे. (IND vs AUS 3rd Test Day 3: तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाकडे 197 धावांची मजबूत आघाडी, स्टिव्ह स्मिथ-मार्नस लाबूशेनची अर्धशतकी भागीदारी)
सिडनी टेस्टच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही संघांकडून काही नवीन आकड्यांची नोंद झाली जी खालीलप्रमाणे आहे.
1. दुसर्या डावात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरची विकेट घेतल्यानंतर अश्विनने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला मागे टाकले. अश्विनला कसोटी क्रिकेटमध्ये दहाव्यांदा वॉर्नरला माघारी धाडलं, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 12 वेळा ऑस्ट्रेलियन फलंदाजांची विकेट मिळवली आहे. इंग्लंडच्या गोलंदाजाने एकूण 11 वेळा वॉर्नरची विकेट घेतली आहे.
2. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणार्या तिसर्या कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी भारतीय संघाचे तीन फलंदाज धावबाद झाले. 13 वर्षांनंतर पहिल्यांदा टीम इंडियावर अशी लाजीरवाणी परिस्थिती ओढवली आहे. 2008 इंग्लंडविरुद्ध मोहाली कसोटी सामन्यात वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि युवराज सिंह असे तीन फलंदाज रनआऊट झाले होते. टेस्ट क्रिकेटच्या एकाच डावात तीन भारतीय खेळाडू धावचीत होण्याचा हा दुर्दैवी योगायोग तब्बल 12 वर्षांनी जुळून आला.
3. सिडनी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या तिसर्या सामन्यात पुजाराने आपल्या कसोटी कारकीर्दीतील सर्वात मंद अर्धशतक झळकावले. सिडनी कसोटी अर्धशतकी धावसंख्या गाठण्यासाठी पुजाराने 174 चेंडूंचा सामना केला. यापूर्वी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2018 मध्ये 173 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
4. सिडनी कसोटी सामन्यात 25 धावांचा टप्पा ओलांडताच रिषभ पंतनं व्हिव्ह रिचर्ड्स यांचा विक्रम मोडीत काढला. ऑस्ट्रेलियात सलग 9 डावांत 25 पेक्षा जास्त धावा काढणारा पंत एकमेव फलंदाज आहे. पंतनं विव्ह रिचर्ड्स यांच्यासह वॅली हॅमोंड आणि रुसी सुर्ती यांचा विक्रम मोडीत काढला. या तिघांनीही ऑस्ट्रेलियात लागोपाठ आठ डावांत 25 पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या. यापूर्वी, पंतने ऑस्ट्रेलियामध्ये 25, 28, 36, 30, 39, 33, 159*, 29 , 29* अशा धावा केल्या आहेत.
दरम्यान, तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला दोन खेळाडूंच्या दुखापतींचा फटका बसला. पॅट कमिन्सचा घातक चेंडूमुळे पंतला एल्बोला दुखापत झाली तर स्टार खेळाडू रवींद्र जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्याने कशीबशी फलंदाजी केली. पण दुसऱ्या डावात गोलंदाजीसाठी मात्र तो येऊ शकला नाही. पंतच्या दुखापतीचं गांभीर्य लक्षात येण्यासाठी त्याला स्कॅनसाठी घेऊन जाण्यात आलं असून लवकरच माहिती अपेक्षित आहे.