IND vs AUS 2020 1st ODI: टीम इंडिया 255 धावांवर ऑलआऊट, शिखर धवन याने केल्या सर्वाधिक 74 धावा
केएल राहुल आणि शिखर धवन (Photo Credit: IANS)

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) मधील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रित केले. अश्या परिस्थितीत भारताने निर्धारित 29,1 ओव्हरमध्ये ऑल आऊट होत 255 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर 256 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली आणि यजमान संघाला मोठा स्कोर करू दिला नाही. ऑस्ट्रेलिया आणि भारत मर्यादित षटकारांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम संघापैकी एक आहे, मात्र आज ऑस्ट्रेलियाने बॉलिंग आणि फिल्डिंगने सर्वांना प्रभावित केले. कांगारू संघाकडून मिशेल स्टार्क (Mitchell Starc) याने 3, पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि केन रिचर्डसन यांनी 2 गडी बाद केले, तर अ‍ॅडम झांपा, एश्टन एगर, यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. दुसरीकडे, भारताकडून शिखर धवन (Shikhar Dhawan) याने सर्वाधिक 74 धावा केल्या, तर केएल राहुल (KL Rahul) याने 47 धावांचे योगदान दिले. (IND vs AUS 2020 1st ODI: रोहित शर्मा याने सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांना मागे टाकत ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचला इतिहास, 'या' यादीत मिळवले अव्वल स्थान)

टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. भारतीय संघाला पहिला धक्का पाचव्या ओव्हरमध्ये उपकर्णधार रोहित शर्मा याच्या रूपात मिळाला. स्टार्कने रोहितला डेविड वॉर्नर याच्याकडे 10 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर धवन आणि राहुलने 120 धावांपेक्षा अधिक धावांची भागीदारी करत संघाला मुश्किल स्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान राहुल 61 चेंडूत 46 धावा करतएगरचा शिखर बनला. एगरने राहुलला स्टिव्ह स्मिथकडे झेलबाद करून माघारी धाडले. धवनने 66 चेंडूत 28 वे अर्धशतक पूर्ण केले. तो 91  चेंडूत 74 धावा काढून बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली याला 14 चेंडूत 16 धावा करून झांपाने पॅव्हिलिअनमध्ये पाठवले. श्रेयस अय्यर 4 धावा करून स्टार्कच्या चेंडूवर विकेटकीपर अ‍ॅलेक्स कॅरीकडे झेलबाद झाला. रवींद्र जडेजा आणि रिषभ पंत ने चांगली भागीदारी करत भारताला 200 धावा करून दिल्या. दोघे मोठे शॉट्स खेळत होते. दोन्ही फलंदाजांमध्ये अर्धशतकी भागीदारी होत असताना रिचर्डसनने जडेजाला 25 धावांवर विकेटकिपर कॅरीकडे झेलबाद केले. जडेजानंतर पंतही बाद झाला. पंतने 33 चेंडूत 28 धावा केल्या आणि कमिन्सच्या चेंडूवर ऍश्टन टर्नरकडे झेलबाद झाला. त्यानंतर शार्दुल ठाकूरला स्टार्कने 13 धावांवर यॉर्कर चेंडूने बोल्ड केले.

आजच्या सामन्यात कोहलीने एक धक्कादायक निर्णय घेतला. प्लेयिंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल यांचा समावेश केला. ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत शानदार फलंदाजी करणारा मार्नस लाबूशेन याने वनडेमध्ये या सामन्यातून पदार्पण केले.