IND vs AUS 2020 1st ODI: रोहित शर्मा याने सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांना मागे टाकत ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचला इतिहास, 'या' यादीत मिळवले अव्वल स्थान
रोहित शर्मा (Photo Credits: Getty Images)

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध मालिकेच्या पहिला वनडे सामन्यात 'हिटमॅन' रोहित शर्मा (Rohit Sharma) काही खास कामगिरी करू शकला नाही. टॉस गमावल्यानंतर रोहित आणि शिखर धवन या जोडीने टीम इंडियाकडून डावाची सुरुवात केली. कव्हरच्या दिशेने रोहितने मिशेल स्टार्क (Mitchell Starc) याच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारत खेळाची सुरुवात केली. त्याच ओव्हरमध्ये त्याने आणखी एक चौकार ठोकला. 15 चेंडूत 10 धावा काढल्यानंतर तो डावाच्या पाचव्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर मिडऑफवर झेलबाद झाला. स्टार्कने त्याला डेविड वॉर्नर (David Warner) याच्याकडे झेलबाद करत त्याचा डाव संपवला. घरच्या मैदानावर 10 धावांच्या खेळीदरम्यान रोहितने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेगवान 1000 धावा केल्याच्या विक्रमाची नोंद केली. रोहितने ऑस्ट्रेलियन संघाविरूद्ध घरच्या मैदानावर 18 वा डाव खेळत हा पराक्रम केला. (IND vs AUS ODI 2020: रोहित शर्मा-शिखर धवन यांच्या जोडीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत विशेष विक्रम नोंदवण्याची संधी)

यापूर्वी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी संयुक्तपणे या रेकॉर्डची नोंद केली होती. घरच्या मैदानावर 19 व्या वनडे सामन्यात सचिन आणि विराटने कांगारु विरोधात 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीत इंग्लंडचा इऑन मॉर्गन चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत स्थान मिळविण्यासाठी मॉर्गनला 25 डाव खेळावे लागले होते. दुसरीकडे, सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा केल्या आहेत. सचिनने 30 डावात 1561 धावा केल्या आहेत, मॉर्गनने 31 डावांमध्ये 1247 धावा केल्या आहेत, कोहलीने 19 डावात 1016 धावा तर रोहितने 18 डावांमध्ये 1000 धावा केल्या आहेत. या यादीत महेंद्र सिंह धोनी या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. घरच्या मैदानावर धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 26 डावांमध्ये 926 धावा केल्या आहेत.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेचे पुढील दोन सामने 17 आणि 19 जानेवारी रोजी अनुक्रमे राजकोट आणि बंगळुरु येथे खेळले जातील. मागील वर्षीच्या भारत दौर्‍यावर कर्णधार आरोन फिंचच्या नेतृत्वातिल ऑस्ट्रेलियन संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशी पिछाडीवर असताना अखेरीस 3-2 अशा फरकाने विजय मिळविला. अशा परिस्थितीत टीम इंडियाला मालिकेत विजय मिळवण्यासाठी रोहितची फलंदाजी चालणे खूप महत्त्वाचे आहे.