ICC WTC Final 2021: भारत आणि न्यूझीलंड संघाचे हे 3 धुरंधर टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात ठोकू शकतात द्विशतक
रोहित शर्मा (Photo Credits: IANS)

ICC WTC 2019-21: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल (ICC World Test championship Final) सामन्यासाठी आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. 18 जून रोजी साउथॅम्प्टनच्या (Southampton) एजस बाउल स्टेडियमवर दोन्ही संघ विजेतेपदाच्या इराद्याने मैदानात उतरतील. टीम इंडियाने (Team India) 2019-21 आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या लीग स्टेज दरम्यान आक्रमक कामगिरी करत 17 पैकी 12 सामन्यात विजय मिळवला असून 2 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तसेच 1 सामना ड्रॉ राहिला. दुसरीकडे, न्यूझीलंडने खेळलेल्या 11 सामन्यांपैकी 7 मध्ये विजय मिळवला आहे. शिवाय 4 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, दोन्ही संघांचे फलंदाज सध्या शानदार फॉर्ममध्ये आहेत आणि टीमला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे, अंतिम सामना रोमांचक होणार यात शंका नाही. तसेच दोन्ही संघात कसे काही धुरंधर फलंदाज आहेत ज्यांच्या बॅटने अंतिम सामन्यात आग ओकली तर ते द्विशतकी धावसंख्येपर्यंत मजल मारू शकतात. (ICC WTC Final 2021: न्यूझीलंड विरोधात टीम इंडिया घेऊ शकते 3 धक्कादायक निर्णय ज्यामुळे उंचावतील तुमच्याही भुवया)

1. रोहित शर्मा (Rohit Sharma)

या यादीत सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्मा. टीम इंडियाचा सलामी फलंदाज टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये द्विशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांपैकी आहे. रोहितने स्पर्धेच्या लीग फेरीत एकूण चार वेळा शंभरी गाठली आहे तर एकदा द्विशतकी धावसंख्या पार केली आहे. रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची कसोटीत 212 धावांची तुफान खेळी केली होती. इंग्लंडच्या खेळपट्टीवर अधिक कसोटी क्रिकेट खेळण्याचा अनुभव नसला तरी रोहित जर बॅटने एकदा क्रीजवर टिकला तर नक्कीच मोठी धावसंख्या करण्याची त्याच्यात क्षमता आहे.

2. केन विल्यमसन (Kane Williamson)

किवी संघात WTC फायनल सामन्यात नेण्यात कर्णधार केन विल्यमसनची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. विल्यमसन ब्लॅककॅप्ससाठी लीग फेरीत तीन दुहेरी शतक करणारा एकमेव फलंदाज आहे. शिवाय, इंग्लंडची परिस्थिती किवी संघाला अधिक उपयुक्त ठरणार असल्याने फायनल सामन्यात संघाला पहिले आयसीसी विजेतेपद मिळवून देण्यासाठी विल्यमसन कडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. विशेष म्हणजे विल्यमसन सर्वाधिक धावा करणारा आघाडीचा फलंदाज आहे. त्याने 9 सामन्यात एकूण 817 धावा केल्या आहेत.

3. विराट कोहली (Virat Kohli)

भारतीय कर्णधार विराटची बॅट मागील दीड वर्षांपासून शांत आहे. कोहलीने अखेर बांग्लादेशविरुद्ध कोलकाता पिंक-बॉल कसोटी सामन्यात 136 धावांची शतकी खेळी केली होती. त्यानंतर तो शंभर धावसंख्येच्या जवळ पोहचला पण शतकी धावसंख्या पार करू शकला नाही. चाहते, तज्ञ व स्वतः विराट देखील आपल्या शतकांचा दुष्काळ संपवण्यासाठी आतुर असेल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामना त्याच्यासाठी मोठे व्यासपीठ ठरू शकते. विराटने टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आजवर 14 सामन्यात 877 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 2 शतक आणि 5 वेळा अर्धशतकी धावसंख्या गाठली आहे.