ICC WTC Final 2021: न्यूझीलंड विरोधात टीम इंडिया घेऊ शकते 3 धक्कादायक निर्णय ज्यामुळे उंचावतील तुमच्याही भुवया
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: IANS)

ICC WTC Final 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (ICC World Test Championship Final) ही भारतीय संघाची (Indian Team) पुढची प्रमुख लढत असणार आहे. 18 जून रोजी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या फायनल सामन्यात भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) संघ आमने-सामने येतील. हा कसोटी सामना इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन (Southampton) येथील द रोज बाउल स्टेडियमवर (Rose Bowl Stadium) खेळला जाईल. आयसीसी कसोटी वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात प्रवेश निश्चित करताना भारतीय संघ (Indian Team) व किवी टीमने गुणतालिकेत अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान पटकावले. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेदरम्यान भारतीय संघाने 17 सामने खेळले असून 12 सामने जिंकले तर 4 सामने गमावले आहेत. तसेच 1 सामना ड्रॉ राहिला. दुसरीकडे, न्यूझीलंडने 11 सामन्यांपैकी 7 जिंकले आणि 4 गमावले. संघात बरेच मॅच-विनर खेळाडू असताना आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप  (ICC World Test Championship) फायनलसाठी प्लेइंग इलेव्हनची निवड करणे भारतीय कर्णधार विराट कोहलीला कठीण काम असेल. इंग्लंडमधील परिस्थिती देखील प्लेइंग इलेव्हनच्या निवडीमध्येही भूमिका बजावेल. (ICC WTC स्पर्धेत सर्वाधिक टीम इंडियासाठी या टॉप 5 बॅट्समनने केल्या सर्वाधिक धावा, किवी संघाला चारणार धूळ)

अशास्थितीत विराट कोहलीचे पुढील 3 धक्कादायक निर्णय ज्यामुळे तज्ञ व चाहत्यांच्याही भुवया उंचावतील.

1. रविचंद्रन अश्विनला डच्चू

अश्विन आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. अश्विनने या स्पर्धेत 13 सामन्यांत (24 डाव) 67 विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंड विरुद्ध फायनल सामन्यात त्याला स्पर्धेचा आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज बनण्याची संधी आहे, तथापि इंग्लंडच्या मैदानाची परिस्थिती मात्र भारतीय स्टेडियमपेक्षा अगदी वेगळी आहे. इंग्लंडमधील खेळपट्टी आणि हवामान वेगवान गोलंदाजांना वेग आणि स्विंग ऑफर करते. भारतीय संघात अष्टपैलू रवींद्र जडेजा देखील आहे जो फिरकी गोलंदाज आहे आणि सामन्यादरम्यान चांगली गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे विराट कोहली अधिक वेगवान गोलंदाजांसह अश्विनला प्ले इलेव्हन मधून वगळण्याचा धक्कादायक निर्णय घेऊ शकतो.

2. उमेश यादवच्या पुढे शार्दूल ठाकूरचा समावेश

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यासाठी भारतीय संघात समावेश झाला आहे. यादवने मागील वर्षी भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान अखेरचा कसोटी सामना खेळला होता. दुखापतीमुळे त्याला मालिकेच्या मधोमध बाहेर पडावे लागले ज्यानंतर ठाकूरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यासाठी स्थान देण्यात आले. ठाकूरने नेत्रदीपक कामगिरी केली. त्यानंतर शार्दुलने इंग्लंडविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिकेमध्ये देखील शानदार कामगिरी बजावली. शिवाय, यादव बराच काळापासून मैदानाबाहेर आहे ज्यामुळे विराट न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये उमेशऐवजी शार्दुलला संधी देण्याचा मोठा निर्णय घेऊ शकतो.

3. केएल राहुल आणि रोहित शर्मा सलामीला

गेल्या वर्षी मनगटाच्या दुखापतीमुळे राहुल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता. पृथ्वी शॉने पहिल्या कसोटीत राहुलची जागा घेतली पण त्यानंतर शुबमन गिलने शॉला संघात ओपनर म्हणून रिप्लेस केले. ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पण करणारा शुभमन चमकला त्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतही त्याला समावेश करण्यात आला. दरम्यान, केएल राहुलने इंग्लंडविरुद्ध टी-20 व एकदिवसीय मालिकेत पुनरागमन केले. तो टी-20 मालिकेमध्ये चांगली धावसंख्या गाठू शकला नाही परंतु वनडे मालिकेत शतक व एक अर्धशतक करत फटकेबाजी केली. आयपीएल 2021 मध्येही राहुलने उत्तम फलंदाजी केली आणि दुसऱ्या सर्वाधिक धावा केल्या. आता राहुलच्या पुनरागमनानंतर कोहलीपुढे राहुल आणि शुबमनमधून रोहित शर्मासाठी सलामी जोडीदार निवडण्याची डोकेदुखी असणार आहे. राहुल बराच काळ कसोटी सामने खेळला नाही आणि कोहलीने सलामीवीर म्हणून गिलच्या जागी त्याची निवड केली तर तो आणखी एक धक्कादायक निर्णय असेल.