भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवर शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला आईसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधून बाहेर पडावे लागले. त्याच्या ऐवजी संघात रिषभ पंतला (Rishibh Pant) स्थान देण्याचे बीसीसीआयने जाहीर केले. काही काळानंतर शिखर संघात पूनरागम करेल, अशी आशा शिखरसह टीम इंडियाला होती. मात्र शिखरच्या गच्छंतीनंतर साऱ्यांचीच निराशा झाली. यावेळी भावूक झालेल्या शिखरने व्हिडिओ शेअर करत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या तर चाहत्यांचे आभारही मानले.
शिखर धवन याने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रीया आल्या. मात्र खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रीया दिली आहे. प्रतिक्रीया देताना त्यांनी शिखरचे कौतुक करत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. ट्विटमध्ये नरेंद्र मोदी म्हणतात की, "प्रिय शिखर, इंग्लंडमधील खेळपट्टीला देखील तुझी उणीव जाणवेल. तू लवकरच रिकव्हर होऊन पुन्हा एकदा फिल्डवर उतरशील आणि देशाच्या विजयात हातभार लावशील, अशी मला आशा आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट:
Dear @SDhawan25, no doubt the pitch will miss you but I hope you recover at the earliest so that you can once again be back on the field and contribute to more wins for the nation. https://t.co/SNFccgeXAo
— Narendra Modi (@narendramodi) June 20, 2019
वर्ल्डकप मधील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्स याचा चेंडू हाताला लागल्याने शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतर शिखरला सक्तीची विश्रांती देण्यात आली. मात्र तीन आठवड्यांनंतर शिखर संघात परतेल अशी आशा होती. पण शिखरला पूर्णपणे बरं होण्यासाठी अजून काही अवधी लागणार आहे.