ICC Women World Cup 2022: महिला विश्वचषक उपांत्य फेरीचे तिकीट टीम इंडियाच्याच हाती, जाणून घ्या कसे होणार कन्फर्म?
भारत महिला टीम (Photo Credit: PTI)

ICC Women World Cup 2022: मेग लॅनिंग हीचा ऑस्ट्रेलिया (Australia) संघ आयसीसी महिला विश्वचषक (Women's World Cup) 2022 मधील पहिला उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. म्हणजेच आता फक्त 3 संघांसाठी जागा शिल्लक आहे. आणि त्यासाठी 7 दावेदार आहेत. या सात संघाच्या शर्यतीत भारताचा (India) संघ देखील आहे. पण मिताली राजच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या सेमीफायनल खेळण्यावर अजूनही संभ्रम कायम आहे. अनेकदा असे घडते की संघांना स्वतःच्या कामगिरीवर तसेच इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागते. पण, भारताचा संघ (Indian Team) या स्पर्धेत सध्या ज्या स्थितीत आहे, त्यांना जे काही करायचे आहे ते स्वबळावर करायचे आहे. म्हणजेच भारतीय संघ उपांत्य फेरीत खेळणार की स्पर्धेतून बाहेर पडणार? याचा निर्णय त्यांच्याच हाती आहे. (IND vs AUS, Women’s World Cup 2022: ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव, ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीत दाखल)

भारत सध्या 5 सामन्यांतून केवळ दोन विजयांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. अशा परिस्थितीत आता भारतीय संघाला सेमीफायनल खेळायचे असल्यास त्यांना पराभव विसरावा लागेल. म्हणजेच आत्तापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांत त्याने जे 3 पराभव पत्करले आहेत ते खूप आहेत. आता आणखी एक पराभव त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. त्यामुळे आता विजय हाच एकमेव मार्ग आहे. भारताचा पुढील सामना बांगलादेश विरुद्ध होणार असून हा त्यांचा स्पर्धेतील सहावा सामना असेल. हा सामना 22 मार्च रोजी होणार आहे. यानंतर ते अखेरच्या साखळी सामन्यात विजयरथावर स्वार असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाशी भिडणार आहे. भारताचा दक्षिण आफ्रिकेशी सामना 27 मार्च रोजी खेळला जाईल.

इतकंच नाही तर भारताला त्यांचा नेट रनरेट इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यापेक्षा जास्त ठेवण्यासाठी मोठ्या फरकाने उर्वरित सामने जिंकावे लागतील. पाकिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे तर पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी वरील तीनही संघ अजूनही धडपड करत आहेत. त्यामुळे टीम इंडियाला त्यांच्या पुढील दोनपैकी कोणत्याही सामन्यात पराभव पत्करावा लागला तर त्यांची स्पर्धेतून बाहेर पडण्याची खात्री पक्की आहे.