Photo Credit - BCCI X

ICC T20I Ranking: हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) ताज्या आयसीसी टी-20 क्रमवारीत (ICC T20I Ranking) मोठी झेप घेतली आहे. हार्दिक क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनला आहे. हार्दिकने लियाम लिव्हिंगस्टनची राजवट संपवली आहे. हार्दिकसोबतच तिळक वर्मालाही लागोपाठ दोन शतके झळकावण्याचे बक्षीस मिळाले असून त्याचा टॉप 10 फलंदाजांच्या यादीत समावेश झाला आहे. भारताने अलीकडेच चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 3-1 ने पराभव केला. (हे देखील वाचा: IPL 2025: 'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्स सोडले नाही...', सुनील गावस्कर यांच्या विधानावर ऋषभ पंतचे प्रत्युउत्तर)

हार्दिक पांड्या पहिल्या स्थानी

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या टी-20 क्रमवारीत, हार्दिक पांड्याला बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत चमकदार कामगिरी केल्याबद्दल पुरस्कृत करण्यात आले आहे. हार्दिक टी-20 मध्ये जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनला आहे. लियाम लिव्हिंगस्टनला मागे टाकत त्याने टी-20 वर वर्चस्व मिळवले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत हार्दिकची कामगिरी दमदार होती. हार्दिकने दुसऱ्या टी-20 मध्ये कठीण परिस्थितीत 39 धावांची दमदार खेळी केली. त्याचबरोबर भारतीय स्टार अष्टपैलू खेळाडूची चेंडूसह कामगिरीही दमदार होती. या वर्षी खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात हार्दिकने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

तिळकची चांगली कामगिरी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत धमाकेदार कामगिरी करणाऱ्या तिळक वर्मालाही त्याच्या शानदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. तिळकने ताज्या टी-20 क्रमवारीत 69 स्थानांची मोठी झेप घेतली असून तो आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना तिळकची कामगिरी अप्रतिम होती. डावखुऱ्या फलंदाजाने तिसऱ्या आणि चौथ्या टी-20 मध्ये शतकी खेळी खेळली होती. त्याचवेळी मालिकेत त्याच्या बॅटमधून 280 धावा झाल्या. त्याच्या चमकदार कामगिरीमुळे तिळकही मालिकावीर ठरला.

सॅमसनलाही झाला फायदा

पहिल्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतके झळकावणाऱ्या संजू सॅमसनने ताज्या टी-20 क्रमवारीत 17 स्थानांची मोठी झेप घेतली आहे. संजू आता टी-20 मधील फलंदाजांच्या क्रमवारीत 22 व्या स्थानावर पोहोचला आहे. ट्रिस्टन स्टब्सनेही तीन स्थानांची प्रगती करत 23व्या क्रमांकावर, तर हेन्रिक क्लासेनने सहा स्थानांनी झेप घेतली आहे.