या 3 संघांनी टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा चारली पराभवाची धूळ, लवकरच ‘ही’ टीम देणार पुन्हा आहे टक्कर
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

एमएस धोनी आणि संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) सध्या विश्व क्रिकेटवर वर्चस्व गाजवत आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने (Indian Cricket Team) वनडे आणि टी-20 वर्ल्ड कप विजेतेपद पटकावले तर 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी देखील पटकावली. त्यानंतर धोनीच्याच नेतृत्वात संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा नंबर-1 टीमचा मान मिळवला. त्यानंतर आता विराटच्या मार्गदर्शनात संघाने सलग पाचव्यांदा आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर-1 चे सिहांसन कायम ठेवले आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाने आजवर 550 सामने खेळले आहेत त्यापैकी 162 जिंकले तर 169 सामने गमावले आहेत. (भारतीय क्रिकेट विश्वातील 5 आश्चर्यकारक क्षण, अनेकांना स्वप्नवत वाटणारे पण प्रत्यक्षात घडलेले; तुम्हाला माहिती आहेत काय?)

नुकतंच संघाने ऑस्ट्रेलिया (Australia), इंग्लंड (England) यांच्यासारख्या बलाढ्य टेस्ट संघाना धोबीपछाड दिला आहे.  डाऊन अंडर ‘विराटसेने’ने सलग कसोटी मालिका जिंकण्याची कमाल केली तर इंग्लंडचा घरच्या मालिकेत धुव्वा उडवला. पण भारतीय टीमला सर्वाधिक वेळा पराभवाची धूळ चरणाऱ्या टॉप-3 संघाची नावे खालीलप्रमाणे आहे.

1. इंग्लंड टीम

भारताला आजवरच्या 550 कसोटी सामन्यांत इंग्लंडने सर्वाधिक 126 वेळा टक्कर दिली आहे. यापैकी टीम इंडियाने 29 सामन्यात विजय आणि 48 मध्ये पराभवाची चव चाखली आहे. तसेच 49 सामने ड्रॉ झाले आहेत. त्यामुळे, इंग्लिश संघाने कसोटी क्रिकेटमध्ये भारतावर पूर्णतः वर्चस्व गाजवले आहे. दोघांमध्ये पहिला सामना 25 जून, 1932 रोजी खेळण्यात आला होता. विशष म्हणजे इंग्लंड आणि भारतीय संघात ऑगस्ट महिन्यात कसोटी मालिका रंगणार असून यजमान संघाकडे भारताविरुद्ध विजयी अर्धशतक करण्याची सुवर्ण संधी आहे.

2. टीम ऑस्ट्रेलिया 

भारतीय संघाला सर्वाधिक वेळा पराभूत करणाऱ्या यादीत कांगारू संघाने दुसरे स्थान पटकावले आहे. इंग्लंडच्या भारताविरुद्ध विजयी संख्येच्या ते जास्त पिछाडीवर नाही आहे. कांगारू संघाविरोधात टीम इंडियाने खेळलेल्या 102 सामन्यात 30 विजय तर 43 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

3. वेस्ट इंडिज (West Indies) टीम

विंडीज संघाने भारताविरुद्ध तिसरे सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत. दोघे आजवर एकूण 98 टेस्ट सामन्यात आमनेसामने आले असून 22 मॅचमध्ये संघ विजयी झाला आहे तर 30 मध्ये त्यांना पराभवाचे तोंड पाहायला लागले आहे. शिवाय, 46 सामने ड्रॉ राहिले आहेत.

दुसरीकडे, टीम इंडियाने न्यूझीलंड आणि श्रीलंका देशांच्या कसोटी संघांवर वर्चस्व गाजवले आहे. न्यूझीलंड विरोधात 21 तर लंकेविरुद्ध संघाने 20 टेस्ट सामने जिंकले आहेत. मात्र, भारतीय टीम किवी संघाचा त्यांच्या देशात फक्त 5 वेळा पराभव करू शकली आहे.