मुंबई: मराठा साम्राज्याच्या इतिहासातील 16 जानेवारी हा सुवर्ण अक्षरांनी कोरलेला दिवस आहे. 16 जानेवारी 1681 रोजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले चिरंजीव, संभाजी महाराज यांचा विधिवत राज्याभिषेक किल्ले रायगडावर पार पडला. आज 2026 मध्येही हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जात आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून धुरा सांभाळताना शंभूराजेंनी दाखवलेले धैर्य आणि त्याग आजही कोट्यवधी तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Sohala Date and History- छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यावर संकटाचे ढग साचले होते. अंतर्गत राजकारण आणि बाह्य आक्रमणे अशा दुहेरी पेचप्रसंगात संभाजी महाराजांनी अत्यंत संयमाने आणि शौर्याने परिस्थिती हाताळली. 18 जून 1680 रोजी त्यांनी रायगड ताब्यात घेतला आणि त्यानंतर 16 जानेवारी 1681 रोजी त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. या सोहळ्याद्वारे त्यांनी रयतेला 'शिवछत्रपतींची व्यवस्था' तशीच पुढे नेण्याची ग्वाही दिली होती.
छत्रपती संभाजी महाराज शौर्य आणि विद्वत्तेचा संगम
संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धाच नव्हते, तर ते अत्यंत विद्वान आणि बहुभाषाकोविद होते. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी 'बुधभूषण' सारखा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. आपल्या 9 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 120 हून अधिक लढाया केल्या आणि विशेष म्हणजे एकाही लढाईत त्यांना पराभव स्वीकारावा लागला नाही. औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला त्यांनी तब्बल नऊ वर्षे महाराष्ट्रातच रोखून धरले, ज्यामुळे उत्तर भारतातील हिंदू राजसत्तांना सावरण्याची संधी मिळाली.
छत्रपती संभाजी महाराज समाजमाध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव
आजच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सोशल मीडियावर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात शुभेच्छा संदेश शेअर केले जात आहेत. 'शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा' आणि 'सह्याद्रीच्या रुद्राचा राज्याभिषेक' यांसारख्या घोषणांनी डिजिटल व्यासपीठ दुमदुमून गेले आहे. गड-किल्ल्यांवरही शिवप्रेमींकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा



छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे आजचे महत्त्व
इतिहासकारांच्या मते, संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एका राजाचा सत्ताारोहण सोहळा नव्हता, तर तो स्वराज्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा संकल्प होता. आजही हा दिवस स्वाभिमान, निष्ठा आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवशंभू प्रेमी आज रायगडावर नतमस्तक होण्यासाठी गर्दी करत आहेत.