ENG vs IND 2nd Test Day 2: इंग्लंड (England) विरोधात लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा (India) पहिला डाव 126.1 ओव्हरमध्ये 364 धावांवर आटोपला आहे. केएल राहुलने (KL Rahul) सर्वाधिक 128 धावा केल्या. रोहित शर्माने (Rohit Sharma) 83 धावा, कर्णधार विराट कोहलीने 42 आणि रवींद्र जडेजाने 40 धावांचे योगदान दिले. तसेच रिषभ पंतने 37 धावांचे छोटेखानी योगदान दिले. राहुल आणि रोहितच्या 126 धावांच्या सलामी भागीदारीने संघाच्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाया भक्कम केला. त्यानंतर राहुलने कर्णधार विराटसोबत शतकी भागीदारी करत संघाचा डाव मजबूत केला. दुसरीकडे, इंग्लिश गोलंदाज पहिल्या डावात सुरुवातीला काही खास प्रभाव पाडू शकले नाही. त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) 5 विकेट्स काढल्या. मार्क वूड व ओली रॉबिन्सनने प्रत्येकी 2 तर मोईन अलीला 1 विकेट मिळाली. (IND vs ENG 2nd Test: विराट कोहलीचा काटा काढण्यासाठी आखली होती ‘ही’ खास योजना, अचूक ठरली इंग्लंडची रणनीती)
नॉटिंगहम येथील पहिला सामना अनिर्णित राहिल्या दुसऱ्या सामन्यात विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने धीमी सुरुवात केली. पण रोहित व राहुलने लय मिळवल्यावर इंग्लिश गोलंदाजांवर हल्ला चढवला. दोंघांनी सलग दुसऱ्या सामन्यात संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. रोहित तुफान फलंदाजी करत असताना राहुलने त्याला साथ दिली. रोहित बाद झाल्यावर चेतेश्वर पुजारा देखील जास्त काळ मैदानात टिकू शकला नाही आणि अवघ्या 9 धावा करून बाद झाला. त्यानंतर राहुलने विराटसोबत मोर्चा सांभाळला व संघाची धावसंख्या दोनशेपार नेली. फक्त आठ धावांनी विराटचे अर्धशतक हुकले.
दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावातील 3 बाद 276 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु होताच भारताला शतकासह मजबूत स्थितीत नेणारा राहुल रॉबिनसनच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आणि राहुल पाठोपाठ तंबूत परतला. चांगल्या लयीत असणारा पंत विकेट्सच्या मागे झेलबाद झाला. पंत बाद होताच पुढच्याच ओव्हरमध्ये मोहम्मद शमीही बाद झाला. इशांत शर्माने संयमी फलंदाजीचे दर्शन घडवले. मात्र तो जडेजाला अधिक काळ साथ देऊ शकला नाही. अँडरसनने त्याला पायचीत करत माघारी धाडलं. अखेरीस बुमराह व जडेजाला बाद करून इंग्लंडने भारताचा पहिला डाव आटोपला.