शाहिद आफ्रिदी (Photo Credit: Getty)

इंग्लड दौऱ्यासाठी रवाना होण्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाला (Pakistan Cricket Team) एक मोठा धक्का बसला आहे. पीसीबीने (PCB) सर्व खेळाडूंची कोरोना व्हायरसची (Coronavirus) चाचणी घेतली होती ज्यात एकूण 10 खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि आता  प्रतिनिधित्व करणारे खेळाडूही याच्या जाळ्यात सापडले आहे. माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याच्यानंतर राष्ट्रीय संघातील खेळाडूंना या घातक व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे आफ्रिदीने नागरिकांना या व्हायरसला गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे. शादाब खान, हैदर अली, हारीस राऊफ, फखर झमान, इमरान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वहाब रियाज यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली. पाकिस्तानचे खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता त्यांच्या इंग्लंड दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (Coronavirus: 10 खेळाडू कोरोना पॉसिटीव्ह आढळले असतानाही पाकिस्तानचा इंग्लंड दौरा ट्रॅकवर, PCB चे मुख्य कार्यकारी वसीम खान यांची माहिती)

आफ्रिदीने ट्विटरवरून खेळाडूंच्या त्वरित बरे होण्याची प्रार्थना केली आणि लिहिले, “फखर, इम्रान खान, काशिफ, हाफिज, हसनन, रिझवान आणि वहाब आणि मलंग यांच्या त्वरित पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना. कृपया चांगली काळजी घ्या. सर्व पाकिस्तानींना आवाहन, कृपया व्हायरस गंभीरपणे घ्या.”

दरम्यान, खेळाडूंना विषाणूचा त्रास होत असतानाही बोर्ड इंग्लंड दौर्‍याबद्दल आशावादी दिसत आहे. हा दौरा जैव-सुरक्षित वातावरणात आयोजित केल्याची चर्चा आहे. 30 जुलैपासून पाकिस्तान टी -20 मालिकेसाठी इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. 28 जुलै रोजी पाकिस्तानी संघ इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. टी-20 मालिका सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपुष्टात येईल. इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तान बोर्डाने 29 जणांच्या संघाची घोषणा केली होती ज्यात काही राखीव खेळाडूंना जागा देण्यात आली होती. बिलाल आसिफ, इमरान बट, मुसा खान आणि मोहम्मद नवाझ हे सध्या पाक संघात राखीव खेळाडू म्हणून आहेत.