कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातले आहे. अनेक सेलेब्जदेखील या विषाणूच्या तावडीमधून सुटू शकले नाहीत. आता हा आजार बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचला आहे. सौरव गांगुली यांचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुली (Snehashish Gangly) यांच्या कुटुंबातील चार जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, राज्य आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. स्नेहाशीषच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. स्नेहाशीष हे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (CAB) चे सचिव आहेत. वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात स्नेहाशीषची सासू आणि सासरे तसेच त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती.
या चौघांनीही आरोग्याची तक्रार होती त्यानंतर सर्वांमध्ये कोविड-19 ची लक्षणे आढळली. या चौघांचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर चौघांनाही खासगी नर्सिंग होममध्ये हलविण्यात आले आहे. नर्सिंग होममधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यांना डिस्चार्ज द्यायचा की नाही हे त्यांच्या चाचणीच्या निकालावर अवलंबून असेल. गेल्या काही दिवसांमध्ये सौरव गांगुली आपल्या भावाच्या संपर्कात आले असले तरी अद्याप त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही. मात्र, बीसीसीआय अध्यक्ष आणि त्यांचे कुटुंबीय पूर्ण काळजी घेत असल्याचे समजत आहे. (हेही वाचा: आयपीएल 2020 रद्द होण्याची शक्यता, PCB चा सप्टेंबर-ऑक्टोबर विंडो दरम्यान कोलंबोमध्ये आशिया चषक आयोजित करण्याचा प्रयत्न)
स्नेहाशीष यांनी आपल्या काळात बंगाल क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व देखील केले होते. स्नेहाशीष यांची चाचणी नकारात्मक आली असून त्यांना घरीच वेगळे राहण्यास सांगितले आहे. आज या सर्वांची पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे आणि त्यांच्या उपचाराबाबत पुढील निर्णय घेतले जातील. पश्चिम बंगालबद्दल बोलायचे झाले तर, कोरोना विषाणूची लागण झालेल्या सक्रिय रूग्णांची संख्या 5,2058 हजार आहे. या व्यतिरिक्त प्राणघातक विषाणूमुळे राज्यात आत्तापर्यंत 529 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील जनतेला दिलासा देणारी बातमी अशी की, आतापर्यंत या साथीच्या रोगापासून 7,303 लोक पूर्णपणे बरे झाले आहेत.