IND-A vs AUS-A Tour Match: भारत-ऑस्ट्रेलिया पहिला सराव सामना ड्रॉ, पहिल्या सराव सामन्यात रिद्धिमान साहाची अर्धशतकी खेळी
रिद्धिमान साहा, भारत-अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया-अ (Photo Credit: Twitter/BCCI)

IND-A vs AUS-A Tour Match: ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर असलेला भारतीय संघ (Indian Team) 17 डिसेंबरपासून कसोटी मालिका खेळणार आहे. पण त्यापूर्वी भारत-अ आणि ऑस्ट्रेलिया-अ संघात तीन दिवसीय सराव सामना खेळला गेला जो अनिर्णित राहिला. सामन्याच्या तिसर्‍या दिवशी यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाने (Wriddhiman Sahan) ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेपूर्वी नाबाद अर्धशतकी खेळी केली आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये आपली दावेदारी मजबूत केली. साहा फलंदाजीला आला तेव्हा भारत अ (India-A) संघाने 104 धावांवर चार गडी गमावले होते. दुसर्‍या टोकापासून विकेट्स पडत राहिल्या मात्र, साहाने आपली विकेट सांभाळत डाव खेळला आणि 100 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. भारत अ टीमने पहिल्या डावात 9 विकेटवर 247 धावांवर डाव घोषित केला, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया अ (Australia-A) संघाने 9 विकेट गमावून 306 धावा केल्या. भारत अ संघाने दुसरा डाव 9 विकेट्स गमावून 189 धावांवर घोषित केला. (IND-A vs AUS-A Tour Match: पृथ्वी शॉ, शुभमन गिल शुन्यावर आऊट; अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीला चेतेश्वर पुजाराची साथ)

दुसरीकडे, ट्रॅव्हिस हेडच्या नेतृत्वात यजमान संघाने त्यांच्या डावात 306/9 आणि 52/1 धावा केल्या. पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल या युवा जोडीने भारताला दोन्ही डावात निराशाजनक सुरुवात केली. पहिल्या डावात दोन्ही सलामी फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. दुसऱ्या डावात शॉ आणि गिलने पहिल्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली. पृथ्वी 19 तर शुभमन 29 धावा करून माघारी परतला. पहिल्या सराव सामन्यात अजिंक्य रहाणेने शतकी खेळी केली, पण दुसऱ्या डावात तो 28 धावा करून बाद झाला. शिवाय, पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारा चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या साहाने दुसर्‍या डावात 54 धावा केल्या. त्याच्यासाठी फिटनेसच्या बाबतीतही हा सराव सामना महत्त्वाचा होता. दुसरीकडे, भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कॅमरून ग्रीनने पहिल्या डावात शानदार शतक ठोकले. त्याने भारतीय गोलंदाजांचा टिकून सामना केला आणि नाबाद 125 धावा केल्या. गोलंदाजीत त्याने दुसऱ्या डावात दोन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात बाद होणार जो बर्न्स एकमेव फलंदाज होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिका 17 डिसेंबरपासून सुरू होणार  असून पहिला कसोटी सामना अ‍ॅडिलेडमध्ये 17 डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. पहिला कसोटी सामना डे-नाईट असेल. दोन्ही संघ पहिल्यांदा दिवस/रात्र कसोटी सामन्यात आमने-सामने येणार आहेत.