
‘नॉट जस्ट अ नाईटवॉचमन: माय इनिंग्ज विथ बीसीसीआय’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात विनोद राय (Vinod Rai) यांनी त्यांच्या 33 महिन्यांच्या कार्यकाळात हाताळलेल्या विविध पैलू समोर आणले. प्रशासकीय समितीचे (सीओए) माजी प्रमुख विनोद राय यांच्या म्हणण्यानुसार अनिल कुंबळे (Anil Kumble) यांना आपल्याला अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याचे वाटले. इतकंच नाही तर त्यांना टीम इंडियाच्या (Team India) मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. तर, कुंबळेच्या शिस्त लागू करण्याच्या धाडसी शैलीमुळे खेळाडू खूश नसल्याचा विश्वास तत्कालीन कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला होता. राय यांनी नुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘नॉट जस्ट अ नाईटवॉचमन: माय इनिंग्ज विथ बीसीसीआय’ (Not Just A Nightwatchman: My Innings with BCCI) या पुस्तकात त्यांच्या 17 महिन्यांच्या कार्यकाळातील विविध पैलूंवर खुलासा केला आहे. रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळात राहुल द्रविड आणि झहीर खान टीम इंडियात का सामील होऊ शकले नाहीत, हे देखील त्यांनी पुस्तकात स्पष्ट केले.
2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कुंबळेने आपला राजीनामा जाहीर केला. कुंबळेला 2016 मध्ये एक वर्षाचा करार देण्यात आला होता. राय यांनी आपल्या पुस्तकात लिहिले की, “कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाशी झालेल्या माझ्या संभाषणात असे दिसून आले की कुंबळे खूप शिस्तप्रिय आहे आणि त्यामुळे संघाचे सदस्य त्यांच्यावर फारसे खूश नव्हते. मी विराट कोहलीशी या मुद्द्यावर बोललो होतो आणि त्याने नमूद केले की संघातील तरुण सदस्य त्यांच्यासोबत काम करताना घाबरले आहेत.” सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या तत्कालीन क्रिकेट सल्लागार समितीने कुंबळेच्या पुनर्नियुक्तीची शिफारस केल्याचे राय यांनी स्पष्ट केले. तथापि, त्यानंतरच्या गोष्टीवरून हे स्पष्ट झाले की कोहलीच्या दृष्टिकोनाला अधिक आदर दिला गेला आणि त्यामुळे कुंबळेचे स्थान असह्य झाले. राय यांनी असेही लिहिले की कुंबळेला असे वाटले की प्रोटोकॉल आणि प्रक्रियेचे पालन करण्यावर अधिक विश्वास दिला गेला आणि त्याच्या मार्गदर्शनात संघाने कशी कामगिरी केली यावर कमी भर दिला गेला.
रायने लिहिले की, कुंबळे ब्रिटनहून परतल्यानंतर त्याच्याशी आमची दीर्घ चर्चा झाली. संपूर्ण एपिसोड ज्या प्रकारे घडला त्यामुळे तो स्पष्टपणे निराश झाला होता. त्याला वाटले की आपल्यावर अन्याय झाला आहे आणि कर्णधार किंवा संघाला इतके महत्त्व देऊ नये. संघात शिस्त आणि व्यावसायिकता आणणे हे प्रशिक्षकाचे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. ज्येष्ठ म्हणून खेळाडूंनी त्यांच्या विचारांचा आदर करायला हवा होता. तथापि कोहली आणि कुंबळे दोघांसाठीही या विषयावर सन्माननीय मौन राखणे राय यांना प्रौढ आणि विवेकपूर्ण वाटले. अन्यथा हा वाद सुरूच राहिला असता. त्यांनी लिहिले की कर्णधार कोहलीने आदरपूर्ण मौन पाळणे खरोखरच समजूतदारपणाचे आहे. त्याच्या कोणत्याही विधानामुळे विचारांचा भडका उडाला असता. राय म्हणाले की, कुंबळेनेही गोष्टी आपल्या बाजूने ठेवल्या आणि कोणत्याही मुद्द्यावर सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नाही. अशा परिस्थितीला सामोरे जाण्याचा हा सर्वात परिपक्व आणि आदरपूर्ण मार्ग होता जो सहभागी सर्व पक्षांसाठी अप्रिय असू शकतो.
दुसरीकडे, 2017 मध्ये जेव्हा रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली तेव्हा BCCI ने आपल्या सुरुवातीच्या ईमेलमध्ये सांगितले की राहुल द्रविड आणि झहीर खान यांची अनुक्रमे फलंदाजी व गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात येईल. मात्र, बोर्डाला हा निर्णय मागे घ्यावा लागला आणि नंतर शास्त्रींचे विश्वासू भरत अरुण यांची पुन्हा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. राय यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केले आहे की काही व्यावहारिक अडचणी होत्या ज्यामुळे द्रविड आणि झहीर या भूमिकेत सामील होऊ शकले नाहीत.