Flying Snake | (Photo Credits-ANI)

उडीसा (Odisha) राज्याची राजधानी भुवनेश्वर (Bhubaneswar) येथून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एक हवेत उडू शकणारा साप (Flying Snake) ताब्यात घेतला आहे. हा साप एका व्यक्तीजवळ होता. हा व्यक्ती हा उडता साप आपल्याजवळच्या टोपलीत ठेवत असे व तो लोकांना दाखवून आपला उदरनिर्वाह करत असे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारे साप पकडने आणि त्याचा वापर उदरनिर्वाहासाठी करणे हे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार (Wildlife Protection Act) गुन्ह्यास पात्र आहे. त्यामुळे आम्ही हा साप ताब्यात घेऊन जंगलात सोडणार आहोत.

या वेळी बोलताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जंगलात किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरात फिरणारे साप अथवा इतर प्राणी लोक पकडतात आणि ते बेकायदेशिररित्या आपल्यासोबत बाळगतात. असे करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करत वन्य प्रण्यांना आम्ही ताब्यात घेतो. या प्राण्यांना परत आम्ही जंगलात सोडतो.

दरम्यान, साप ताब्यात घेण्यापूर्वी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या सापाचा आणि तो बाळगणाऱ्या व्यक्तीचे व्हिडिओ चित्रिकरण केले आहे. या व्हडिओत स्पष्ट दिसते की, साप एका टोपलीत आहे. जी टोपली संबंधित व्यक्तिच्या हातात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. सर्पमित्र आणि सापांच्या प्रजातींचा अभ्यास असणाऱ्या अभ्यासकांनी सांगितले की हा साप क्रायसोपीलिया ऑर्नाटा (Chrysopelea Ornata) या प्रजातीतील आहे. क्रायसोपीलिया ऑर्नाटा ही एक हवेत उडू शकणाऱ्या सापाची प्रजाती आहे. (हेही वाचा, Nag Panchami 2019: नागपंचमी सणानिमित्त जाणून घ्या भारतात आढळणाऱ्या विषारी सापांच्या खास प्रजाती)

एएनआय ट्विट

दरम्यान, केवळ सापच नव्हे तर, पाळीव प्राणी सोडून इतर कोणताही प्राणी पाळणे, सोबत बाळगणे कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी, भारतातील अनेक लोक जंगली प्राणी पाळतात आणि सोबतही बळगतात. जे कायद्याने गुन्ह्यास पात्र आहे. असे लोक कायद्याने कारवाईस पात्र ठरतात. दरम्यान, काही संस्थाही अवैध पद्धतीने केवळ परंपरांचे पालन म्हणून प्राणी अथवा पक्षी सोबत बाळगल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.