Standing Seats in Budget Airlines

गेल्या 3 दशकांमध्ये, हवाई प्रवास हा लक्झरी ते बजेट एअरलाइन्समध्ये बदलला. विमानातील जागा लहान झाल्या, आसनांमधील अंतर कमी झाले. सध्या  अतिरिक्त जागा वाचवून विमानांमध्ये अधिकाधिक सीट्स जोडल्या जात आहेत. यामुळे कधीकधी मधल्या सीटवर बसणे एक आव्हान ठरते, मात्र असे असूनही, विमानतळांवरील गर्दी कमी होत नाहीये. किंबहुना गेल्या काही वर्षांमध्ये विमानाने प्रवास करण्याची मागणी वाढली आहे. म्हणूनच विमान कंपन्या अधिकाधिक कमाई करण्यासाठी खर्च कमी करण्याचा आग्रह सतत धरतात. याच पार्श्वभूमीवर आता विमान कंपन्या प्रवाशांना उभे राहून प्रवास (Standing Seats) करण्याचा पर्याय देणार आहेत.

सोशल मिडियावर याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. कमी खर्चाच्या विमान कंपन्या (बजेट एअरलाइन्स) 2026 पासून अल्प-मार्गाच्या प्रवासासाठी ‘उभे राहण्याचे आसन’ (स्टँडिंग सिट्स) सादर करण्याच्या तयारीत आहेत, ज्यामुळे प्रवास खर्च कमी होईल आणि विमानात अधिक प्रवासी सामावतील. सोशल मीडियावर दावा केला होता की, कमी किमतीची विमान कंपनी रायनएअर लवकरच या 'सॅडल प्रकारच्या स्टँडिंग सीट्स'सह उड्डाणे सुरू करेल, ज्यामुळे भाडे आणखी कमी होईल. मात्र कंपनीने म्हटले आहे की हे अहवाल पूर्णपणे खोटे आहेत.

तर या आसनांना ‘स्काय रायडर 2.0’ असे नाव देण्यात आले असून, इटालियन कंपनी अॅव्हियोइंटेरियर्सने त्यांची रचना केली आहे. ही आसने पारंपरिक खुर्च्यांऐवजी सायकलच्या सॅडलसारखी असतील, जिथे प्रवासी पूर्णपणे बसण्याऐवजी 45-अंश कोनात झुकून उभे राहतात. यामुळे विमानाची प्रवासी क्षमता 20% वाढेल आणि तिकीटांचे दर लक्षणीयरीत्या कमी होतील, जसे की 1 ते 5 युरो (अंदाजे 90 ते 450 रुपये) पर्यंत. मात्र या कल्पनेने प्रवाशांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींना कमी खर्च आकर्षक वाटतो, तर काहींनी याला अस्वस्थ आणि असुरक्षित मानले आहे.

Standing Seats in Budget Airlines:

स्काय रायडर 2.0 ही आसने 2018 मध्ये जर्मनीतील हॅम्बर्ग येथे आयोजित एअरक्राफ्ट इंटेरियर्स एक्स्पोमध्ये प्रथम सादर करण्यात आली होती. ही 2010 मधील मूळ स्काय रायडर संकल्पनेची सुधारित आवृत्ती आहे, जी त्यावेळी नियामक मंजुरी आणि प्रवासी स्वीकृतीच्या अभावामुळे अयशस्वी ठरली होती. नवीन आवृत्तीत अधिक मऊ गादी आणि मजबूत संरचना आहे, ज्यामध्ये प्रत्येक आसन रांग जमिनीपासून छतापर्यंत खांबांनी जोडलेली आहे. प्रत्येक आसनाला सेफ्टी बेल्ट आहे.

ही आसने पारंपरिक इकॉनॉमी आसनांपेक्षा 50% हलकी आहेत आणि त्यांचे भाग कमी असल्याने देखभाल खर्च कमी होतो. यामुळे विमानांचे इंधन वापर कमी होईल आणि विमान कंपन्यांना कमी दरात तिकिटे देणे शक्य होईल. ही आसने दोन तासांपेक्षा कमी कालावधीच्या अल्प-मार्गाच्या उड्डाणांसाठी डिझाइन केली आहेत. याशिवाय, हलकी आसने आणि सुलभ डिझाइनमुळे विमानाची स्वच्छता आणि देखभाल जलद होईल, ज्यामुळे विमानांचा जमिनीवरील वेळ कमी होईल आणि अधिक उड्डाणे शक्य होतील.

स्काय रायडर 2.0 ने युरोपियन आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा चाचण्या उत्तीर्ण केल्या असल्या, तरी अद्याप काही आव्हाने आहेत. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि इतर नियामकांनी याला अद्याप मंजुरी दिलेली नाही. याशिवाय, विमानातील प्रवासी वाढल्याने प्रत्येक 50 प्रवाशांमागे दोन फ्लाइट अटेंडंट्सची आवश्यकता आहे, ज्यामुळे कर्मचारी खर्च वाढेल. तसेच, विमानाच्या छताच्या वक्रतेमुळे सर्व रांगा उभ्या आसनांनी भरता येणार नाहीत, ज्यामुळे अपेक्षित 20% क्षमता वाढ साध्य होण्यात अडचणी येऊ शकतात. काही बजेट कमी असणारे प्रवासी स्वस्त भाड्याच्या बदल्यात अशा जागा नक्कीच निवडतील, परंतु मोठ्या प्रमाणात ते स्वीकारले जाण्याची शक्यता कमी आहे.