Mizoram Boy Runs Over Chicken | (Photo Credits: Facebook)

कोंबडीच्या जखमी पिल्लाला घेऊन एक चिमूकला थेट हस्पिटलमध्ये पोहोचला. त्याची मानवता, प्रेमळ वृत्ती आणि निष्पापपणा पाहून हॉस्पिटलमधील डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. घटना आहे मिझोराम (Mizoram) राज्यातील साइरंग (Sairang Mizoram) येथील. एक मुलगा (नाव समजू शकले नाही) आपल्या छोट्या सायकलवरुन खेळत होता. दरम्यान, कोंबडीचे (Chicken) एक पिल्लू चुकून त्याच्या सायकलखाली आले आणि जखमी झाले. पिल्लू जखमी झालेले पाहून हा मुलगा व्याकूळ झाला. त्याने ते पिल्लू उचलले, सोबत पॉकेटमनी म्हणून मिळालेले सर्व पैसे घेतले आणि पिल्लावर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल गाठले. एका फेसबुक युजरने या मुलाचा फोटो आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, Sanga Says नावाच्या फेसबुक अकाऊंटवर या मुलाचा फोटो शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे एक लाखांहून अधिक फेसबुक युजर्सनी या फोटोला लाईक केले आहे. तर, 76 हजारांहून अधिक लोकांनी हा फोटो शेअर केला आहे. या मुलाचा निष्पापपणा पाहून या फोटोखाली प्रतिक्रियांचा अक्षरश: खच पडला आहे. एका हातात कोंबडीचे जखमी पिल्लू , दुसऱ्या हातात पॉकेटमनी आणि चेहऱ्यावर अपराधी आणि निष्पाप भाव अशा या छायाचित्राचे प्रचंड कौतुक केले जात आहे. (हेही वाचा, 101 व्या वर्षी तिने 'आई' होण्याची इच्छा केली पूर्ण; जाणून घ्या काय आहे सत्यता)

व्हायरल फोटो आणि फेसबुक पोस्ट 

फेसबुक युजर Sanga Says ने हा फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिली आहे की, हा मुलगा मिजोराम येथील साइरंग येथील राहणारा आहे. तो सायकलवरुन खेळत असताना त्याची सायकल कोंबडीच्या पिल्लावर गेली. ज्यामुळे कोंबडीचे पिल्लू जखमी झाले. या घटनेमुळे हा मुलगा प्रचंड दु:खी झाला.

दरम्यान, दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, कोंबडीच्या या पिल्लाचे प्राण वाचले की नाही हे माहिती नाही. परंतू, या मुलाने आपले कर्तव्य मात्र जबाबदारीने पार पाडले.