PIB Fact Check: WHO कडून कोरोना खरंच सीझनल वायरस असल्याचा दावा? पहा या वायरल मेसेज वर करण्यात आलेला खुलासा
Screenshot of fake message on coronavirus (Photo Credits: PIB)

कोरोना संकटामध्ये एकीकडे जीवघेण्या कोविड 19 आजाराबाबत नवनव्या अपडेट्स समोर येत असतानाच सोशल मीडीयामध्ये अनेक खोट्या बातम्या, खोटे दाखले, फेक न्यूज यांचे पेव फूटले आहे. त्यामुळे सोशल मीडीयामध्ये फिरणारे कोणते मेसेज किती खरे आणि किती खोटे याचा कधीकधी अंदाजच लागत नाही. अशामध्येच आता जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देत असा एक दावा केला जात आहे की कोरोना हा एक सीझनल वायरस आहे आता यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, आयसोलेशन यांची गरज नाही. पण केंद्र सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खोडून काढला आहे. त्यामुळे तुमच्यापर्यंतही हा खोटा दावा आला असेल तर त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी सरकारने यावर केलेला खुलासा नक्की पहा.

पीआयबी फॅक्ट चेक या केंद्र सरकारच्या वृत्त विभागाच्या ट्वीट अकाऊंटवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार. कोविड 19 हा संसर्गजन्य आहे आणि सोशल मीडीयात सध्या वायरल होत असलेला दावा खोटा आहे. कोरोना संकटात सध्या कोविड 19 नियमावलीचं पालन करणं गरजेचे आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, हात वारंवार धुणे आणि मास्कचा वापर आवश्यक आहे. Fact Check: कोरोना संकटकाळात WHO कडून दिले जात आहेत रोख पैसे? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या मेसेजमागील सत्य.

पीआयबी फॅक्ट चेक ट्वीट

सध्या भारतामध्ये मागील 2 महिने धुमाकूळ घालत असलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. यामध्ये लसीकरण वेगवान करत आता तिसरी लाट थोपवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सध्या लसीचे पहिले, दुसरे डोस घेतलेल्यांनाही मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान अशाप्रकारे जागतिक आरोग्य संघटना किंवा देशा-परदेशातील संस्थांंच्या नावावर खोटे दाखले देण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. यापूर्वी अशीच खोटी वृत्त मोठ्या प्रमाणात वायरल झाली आहेत. त्यामुळे तुमच्याकडे येणार्‍या प्रत्येक मेसेजवर थेट विश्वास ठेवू नका. त्याची खातरजमा करून घ्या.