PIB Fact Check (Photo Credits: Twitter)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या संकटामुळे लोक घाबरले आहेत, याचाच फायदा घेत विविध प्रकारची माहिती, बातम्या व्हायरल होत आहेत. यामध्ये बरेचदा लोकांची दिशाभूल करणाऱ्या बाबींचाच मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. जनताही समोर आलेल्या माहितीची खातरजमा न करता ती पुढे पाठवत असते. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर असाच एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कोरोना फंडच्या रूपाने लोकांना पैसे दिले जात असल्याचे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे डब्ल्यूएचओ (WHO) कडून हे पैसे दिले जात असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. आता पीआयबी फॅक्ट चेकच्या (PIB Fact Check) टीमने याची तपासणी केली, असता ही माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आले आहे.

ही माहिती इंटरनेटवर शेअर केली जात आहे. या मेसेजमध्ये म्हटले आहे की, डब्ल्यूएचओकडून कोविड-19 मदत योजनेतून 10 हजार लोकांना रोख पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर संदेशात असेही सांगितले आहे की तुम्हाला 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत पुरस्कार मिळू शकतो, जो कोरोना व्हायरस लस निधीतून देण्यात येईल. या व्यतिरिक्त या संदेशात एक लिंकही देण्यात आली आहे व त्यावर क्लिक करण्यास सांगितले आहे. मात्र, अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करणे धोकादायक ठरू शकते. (हेही वाचा: Fact Check: 'MyGov Corona Vaccine Appt' चा वापर करुन Telegram वर कोविड-19 लसीसाठी अपॉयमेंट बुक करता येईल? PIB ने सांगितले सत्य)

पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या माहितीची पडताळणी केली. तपासणीत ही माहिती खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचे आढळले. त्यामुळे, तुम्हालाही जर का असा संदेश प्राप्त झाला असेल तर त्यावर विश्वास ठेऊ नका व तो पुढे पाठवू नका. पीआयबी फॅक्ट चेकच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. या मेसेजमध्ये लिंकवर क्लिक करण्यास सांगितले असल्याने, त्याद्वारे तुमची वैयक्तिक माहिती प्राप्त करण्यासाठी रचलेला हा डाव असल्याचेही पीआयबीने म्हटले आहे.