Gurugram Accident: भरधाव वेगाने जाणारी Porsche गाडी झाडावर आदळली; 2 कोटींची कार जाग्यावरच जळून खाक
Gurugram Accident (Photo Credit ANI)

दिल्लीच्या गुरुग्राममधील (Gurugram) गोल्फ कोर्स रोडवर एक मोठा कार अपघात झाला. अवघ्या 2 मिनिटांत झालेल्या अपघातात तब्बल 2 कोटी रुपयांची पोर्श कार (Porsche) जळून खाक झाली. गुरुग्राममधील गोल्फ कोर्स रोडवर गुरुवारी पहाटे 4 वाजता हा अपघात झाला. या ठिकाणी ही महागडी स्पोर्ट्स कार भरधाव वेगात एका झाडावर आदळली. त्यानंतर ही गाडी जागेवरच पूर्णपणे जळाली.

घटनास्थळावरून जाणाऱ्या प्रवाशांनी अग्निशमन विभाग आणि पोलिसांना याची माहिती दिली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. अपघाताच्या वेळी कारमध्ये 2 लोक होते, दोघांनीही गाडीला आग लागताच बाहेर पळ काढला आणि त्यांचे प्राण वाचले.

ही कार गोल्फ कोर्स रोडवरील सेक्टर 56 वरून येत होती आणि सिकंदरपूरकडे जात होती. कार सेक्टर 27 मधील दुभाजकाला धडकून सर्व्हिस लेनवर आली व त्यानंतर एका झाडावर जाऊन आदळली. त्यानंतर गाडीने पेट घेतला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही कार कोणाची होती आणि कोण चालवत होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. (हेही वाचा: Bride Entry On Bullet: वडिलांनी दिलेल्या बुलेटवर नवरीने लग्नात केली धमाल एन्ट्री, व्हिडीओ व्हायरल)

दरम्यान, ही कार पोर्श जर्मनी 911 आहे, जी एक स्पोर्ट्स कार आहे. या कारच्या क्रमांकावरून ती चंदिगडची असल्याचे दिसून येत आहे. या गाडीला लागलेली आग एवढी भीषण होती की, तिच्या ज्वाळा दूरवर दिसत होत्या. या कारची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. पोर्श 2004 पासून भारतात कारचा पुरवठा करत आहे. पोर्श सध्या भारतात स्पोर्ट्स कार आणि एसयूव्ही विकते. ही कार अतिशय सुरक्षित मानली जाते.