कोरोना विषाणूशी लढणाऱ्या सर्व मदतगारांना धन्यवाद देणारं खास Google Doodle!
Google Doodle to Thank You all Coronavirus Helpers (Photo Credits: Google)

संपूर्ण जगात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. एखाद्या प्रदेशात शिरकाव केल्यानंतर वेगाने पसरणाऱ्या या विषाणूची लागण जगात लाखो लोकांना झाली आहे. तर कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. कोरोनाच्या या महाभयंकर संकटाचा सामना करण्यासाठी अनेक देश लॉकडाऊन करण्यात आले आहेत. तर यातून बाहेर पडण्याचे अनेक प्रयत्न केले जात आहेत. या कठीण काळात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवेत कार्यरत असलेली मंडळी जीवाची पर्वा न करता काम करत आहे. या सगळ्यांच्या कार्याचा सन्मान करत त्यांना धन्यवाद देण्यासाठी गुगलने 6 एप्रिल पासून डूडलची खास सिरीज सुरु केली होती. प्रत्येक दिवशी विविध माध्यमातील मदतगारांचे खास डुडलच्या माध्यमातून आभार मानले होते. आज गुगलने या सर्वांचे एकत्रितपणे आभार मानणारे डूडल साकारले आहे. यात सर्व कोरोना व्हायरस मदतगार एकत्र दिसत आहेत आणि त्यांच्या मध्ये एक गुलाबी रंगाचे हार्ट दिसत आहे. आजच्या डुडलमध्ये आतापर्यंत साकारण्यात आलेली सर्व डुडल्स एकत्रितपणे पाहायला मिळत आहेत.

देशातील इतर नागरिक सुरक्षित राहावेत म्हणून पोलिस फोर्स अहोरात्र मेहनत घेत आहे. तर डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय सेवेत असलेले कर्मचारी, मेडिकल स्टोर्स मधील कर्मचारी आपल्या आरोग्यसाठी दिवसरात्र काम करत आहेत. परिसर स्वच्छ रहावा म्हणून सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. इतकंच नाही तर Coronavirus Pandemic दरम्यान Packaging, Shipping, and Delivery Workers काम करत आहेत. किराणा सामान विक्रेते, भाजीपाला-फळ विक्रेते आपल्याला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत. तर शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून शिकवत आहेत. या सर्वांना गुगलने डूडल साकारुन धन्यवाद दिले आहेत.

खास प्रसंगी डूडल साकारुन तो दिवस सेलिब्रेट करण्याची गुगलची परंपरा या कठीण काळातही गुगलने कायम राखली आहे. संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसच्या कचाट्यात 19 लाखाहून अधिक लोक सापडले आहेत. तर तब्बल 1 लाख 20 हजार लोकांचा मृत्यू झाला. ही संख्या सातत्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.