Fact Check: प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे मिळत आहे 1% व्याजाने कर्ज? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य
Fact Check (संग्रहित संपादित प्रतिमा)

सोशल मिडियावर सध्या खोट्या आणि बनावट बातम्यांचा (Fake News) सुळसुळाट आहे. कोणीही उठून काहीही बातमी बनवून ती सोशल मिडियावर पोस्ट करत असते. आता जर तुम्ही कुठे ऐकले असेल किंवा वाचले असेल की प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे 1 टक्के व्याज दराने कर्ज दिले जात आहे, तर हा दावा पूर्णतः खोटा आहे. सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही. अशा संदेशांपासून सावध राहा, असे पीआयबीचे म्हणणे आहे. सोशल मिडियावर पसरणाऱ्या खोट्या बातम्यांबाबत पीआयबी सतत लोकांना जागरूक करत आहे. पीआयबीची फॅक्ट चेक टीम तुम्हाला अशा बनावट बातम्यांपासून सावध करते.

आता कर्जाबाबत व्हायरल होत असणाऱ्या संदेशामध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान योजनामध्ये आधार कार्डद्वारे 1 टक्के व्याजाने कर्ज मिळत असून 50 टक्के सूट दिली जात आहे. याबाबत सरकारी संस्था पीआयबीचे म्हणणे आहे की, केंद्र सरकार 'प्रधानमंत्री योजना' नावाची कोणतीही योजना चालवत नाही. अशा कोणत्याही योजनेअंतर्गत कर्ज दिले जात नाही. एका ट्वीटद्वारे त्यांनी ही माहिती दिली.

याआधी एका यूट्यूब चॅनेलवर दावा केला गेला होता की, केंद्र सरकारच्या ‘एक कुटुंब एक नोकरी योजना’ अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल. त्यावेळी ही पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा बनावट असून अशी कोणतीही योजना केंद्र सरकार चालवत नसल्याचे सांगितले होते. (हेही वाचा: Fact Check: सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळत आहे स्कॉलरशिप? सत्य घ्या जाणून)

दरम्यान, जर तुम्हाला देखील एखादी बातमी किंवा माहितीमध्ये दिलेल्या तथ्यांबद्दल शंका असेल तर तुम्ही ती PIB FactCheck ला पाठवू शकता. सर्व तपास केल्यानंतर तुम्हाला योग्य माहिती दिली जाईल.