Fact Check: दिवसातून तीन वेळा चहा पिल्याने Covid-19 चा संसर्ग होणार नाही? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या मेसेजमागील सत्य
Fact Check (Photo Credit : Twitter)

देशात कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाची दुसरी लाट सुरु आहे. दररोज लाखो नवीन प्रकरणे समोर येत आहेत व त्यामुळे आरोग्य यंत्रणाही कोलमडली आहे. अशात सोशल मीडियावर कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध घरगुती उपाय सांगितले जात आहेत. याबाबतची लांबलचक यादीच आपल्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सापडेल. परंतु अशा गोष्टींना कोणता आधार आहे? तर नाही. आताही सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की चक्क चहा (Tea) पिण्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखता येऊ शकतो आणि यामुळे संक्रमित व्यक्तीही लवकर बरे होऊ शकते. पीआयबी फॅक्ट चेक टीमने या मेसेजची तपासणी केली आहे.

कोरोना काळात, अनेक अफवा व दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पीआयबी फॅक्ट चेक टीममार्फत अशा सर्व अफवांचा शोध घेण्यात येत असून त्याची सत्यता सर्वांसमोर मांडली जात आहे. आता चहा पिल्याने कोरोना व्हायरस दूर होत असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. या गोष्टीची छाननी करत पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, हा दावा पूर्णतः खोटा आहे. चहा पिल्यास कोविड-19 च्या संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो यासाठी कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत. (हेही वाचा: नाकात लिंबूचा रस घातल्यावर 5 सेकंदामध्ये बरा होईल Covid-19 चा संसर्ग? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य)

तर अशाप्रकारे चहा पिल्याने कोरोनाचा संसर्ग टाळता येतो ही माहिती खोटी असून, यामुळे लोकांची दिशाभूल केली जात असल्याचे दिसले आहे. काही दिवसांपूर्वी खाऊच्या पानबद्दल अशीच अफवा पसरली होती. खाऊच्या पानाचे सेवन केल्यास कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो आणि संक्रमित व्यक्तीदेखील बरी होऊ शकते असे त्या मेसेजमध्ये म्हटले होते. त्यानंतर पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने हा दावाही चुकीचा असल्याचे सांगितले होते.