Fact Check: नाकात लिंबूचा रस घातल्यावर 5 सेकंदामध्ये बरा होईल Covid-19 चा संसर्ग? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य
PIB Fact Check (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशात कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या वाढत्या प्रमाणासोबत नागरिकांच्या मनातील भीतीही वाढत आहे. सध्या रुग्णालयातील अवस्था पाहता लोक या विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी जवळजवळ सर्व उपयोजना करीत आहेत. याच गोष्टीचा फायदा घेत सोशल मिडियावर अनेक दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. यामध्ये कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या किंवा त्यावर मात करण्याच्या घरगुती उपाययोजनांना ऊत आला आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की नाकामध्ये लिंबूचा रस घातल्याने कोरोना विषाणू निघून जाऊ शकतो. मात्र ही माहिती पूर्णतः चुकीची असल्याचे केंद्र सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) टीमने सांगितले आहे.

या व्हिडीओमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी उपाय सांगितला आहे की, ‘एक लिंबू घ्या, तो चांगला पिळा व त्याच्या रसाचे तीन थेंब दोन्ही नाकांमध्ये घाला. त्यानंतर डोके वर करून सोडून द्या. यानंतर 5 सेकंदामध्ये तुमच्या शरीराची संपूर्ण यंत्रणा शुद्ध होईल. हा उपाय नाक, कान, घसा यासाठी रामबाण उपाय आहे. तसेच संगामुळे ताप असल्यास हा उपाय करू शकता. कोणतीही समस्या असल्यास त्यावर या उपाय फायदेशीर ठरणार आहे. फक्त एकदा या प्रयोग करून बघा तुम्हाला अनुभव येईल. ज्या कोणी हा उपाय योजला आहे अशा कोणत्याही व्यक्तीला मरताना मी पाहिले नाही. हा उपाय केल्यावर प्रत्येक व्यक्ती ठीक झाली आहे.’

हा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर आता पीआयबी फॅक्ट चेक टीमने ट्वीट करत हा व्हिडीओ खोटा असल्याचे सांगितले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की लिंबाचा रस नाकात टाकल्यास कोरोना विषाणूचा त्वरित नाश होईल. मात्र या व्हिडिओमध्ये केलेला दावा पूर्णतः खोटा आहे. नाकात लिंबाचा रस टाकल्याने कोविड-19 संसर्गापासून सुटका होईल याबाबत कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.’ (हेही वाचा: COVID-19 मुळे देशात 3 मे ते 20 मे दरम्यान संपूर्ण Lockdown लागू होणार? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या मेसजमागील सत्य)

यापूर्वीही असे अनेक दावे सोशल मिडियावर व्हायरल झाले होते मात्र प्रत्येकवेळी हे दावे खोटे असून, त्याने लोकांची दिशाभूल होत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे तुम्हीही कोणत्याही बातमीची किंवा माहितीची खात्रीकेल्याशिवाय ती पुढे पाठवू नका.