भारतात कोविड-19 वरील लस (Covid-19 Vaccine) लॉन्च झाल्याचा एक मेसेज व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) फिरत आहे. या व्हायरल मेसेज मध्ये एक लिंक देण्यात आली असून त्याद्वारे व्हॅक्सिन अॅप (Vaccine App) डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) तथ्य तपासणी करुन हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले आहे. तसंच देशात अद्याप कोरोना व्हायरस वरील लस लॉन्च झाली नसल्याचेही स्पष्ट केले आहे. (Fact Check: 'स्त्री स्वाभिमान योजने'अंतर्गत केंद्र सरकार महिला बँक खात्यात 1 लाख 24 हजार रुपये जमा करीत आहे? PIB ने केला खुलासा, जाणून घ्या)
"कोरोना लस भारतात लॉन्च झाली आहे. तुमचा नंबर रजिस्ट्रर करा आणि लसीसाठी आजच अप्लाय करा. त्यासाठी व्हॅक्सिन अॅप डाऊनलोड करा," असे व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे. दरम्यान पीआयबीने ट्विटच्या माध्यमातून या मागील सत्य सांगितले आहे. "हा दावा खोटा आहे. कोरोना लस किंवा व्हॅक्सिन अॅप काहीही अद्याप देशात लॉन्च झालेले नाही," असे पीआयबीने म्हटले आहे. सरकारी धोरणं, योजना यांच्याविषयी चुकीच्या माहितीचा खुलासा करण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेक हे एक समर्पित व्यासपीठ आहे.
Fact Check By PIB:
A #WhatsApp forward is claiming that a 'Corona Vaccine' has been launched in India and people have to register for it by downloading a 'Vaccine App.'#PIBFactCheck: This Claim is #Fake. No #COVID19 vaccine has been launched in the country yet. pic.twitter.com/VCt1tylmHc
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 18, 2020
देशात आणि देशाबाहेर सध्या कोविड-19 लसीच्या क्लिनिकल ट्रायल्स विविध टप्प्यात सुरु आहेत. परंतु, अद्याप कोणत्याही लसीला मंजूरी मिळालेली नाही किंवा कोणतीही लस देशात लॉन्चही करण्यात आलेली नाही. दरम्यान, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्रॅजेनेका लसीच्या चाचण्या पुण्यातील सीरम इंस्टिट्युड ऑफ इंडिया करत आहे. कोविशिल्ड या नावाने ही लस ओळखली जात असून सध्या याच्या अंतिम टप्प्यातील ट्रायल्स सुरु आहेत.
रशियाच्या Sputnik V लसीच्या क्लिनिकल ट्रायल्स आणि लस वितरणासाठी Russian Direct Investment Fund ने हैद्राबाद मधील Dr Reddy’s Laboratories सोबत भागीदारी केली आहे. तसंच भारतात Covaxin चे निर्मिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि भारत बायोटेक करत आहे. गुजरातमधील Zydus Cadila Ltd ने विकसित केलेली लस क्लिनिकल ट्रायल्सच्या दुसऱ्या टप्प्यात आहे.