Fact Check: पीएम लाडली लक्ष्मी योजनेंतर्गत केंद्र सरकार मुलींना देत आहे 1 लाख 60 हजार रुपये? जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागील सत्य
Fake Claim by YouTube Video Debunked (Photo Credits: Twitter/PIbFactCheck)

सोशल मीडिया आणि यूट्यूबवर दररोज अनेक बातम्या, माहिती व्हायरल होत असते जे पाहून लोकांचा गोंधळ उडतो. बरेचदा अशा बातम्यांची तथ्ये तपासल्याशिवाय त्या पुढे पाठवल्या जातात आणि अनेक लोक त्यावर ‘सत्य’ म्हणून विश्वासही ठेवतात. मात्र पडताळणीनंतर अशा मेसेजेसचे काही वेगळेच सत्य बाहेर (Fake News) येते. सध्या एक यूट्यूब व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दाखवण्यात येत आहे की केंद्र सरकारने पीएम लाडली लक्ष्मी योजना (PM Laadli Lakshmi Yojana) सुरू केली आहे. या लाडली योजनेअंतर्गत 1,600000 रुपये वितरीत केले जात आहेत. या योजनेअंतर्गत मुलींना 1 लाख 60 हजार रुपये दिले जात आहेत.

हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांना यामागील सत्य काय आहे हे समजले नाही. या बातमीवर विश्वास ठेऊन आपल्या घरी काही पैसे येतील या आशेने काही जणांनी या मेसेजची चौकशीही सुरू केली आहे. काहींनी तर मुलगी झाल्यावर एवढी मोठी रक्कम मिळण्याचे स्वप्न रंगवले आहे. परंतु या बातमीमागील सत्य वेगळेच आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नाही. या बातमीचा तपास पीआयबी फॅक्ट चेकने केला, ज्यामध्ये आढळले की ही फेक न्यूज आहे.

पीआयबीच्या फॅक्ट चेकने म्हटले आहे की, '#यूट्यूब व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की पीएम लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत सर्व मुलींना केंद्र सरकारकडून 1,60,000 ची रोख रक्कम दिली जात आहे. पीआयबीने याचा तपास केला असून, हा दावा खोटा असल्याचे आढळले आहे. अशी कोणतीही योजना केंद्र सरकार चालवत नाही.’ (हेही वाचा: मोदी सरकार नागरिकांच्या खात्यात 2 लाख 67 हजार रुपये जमा करत असल्याचा मेसेज व्हायरल; PIB ने केला खुलासा)

यूट्यूबवर अशा बनावट बातम्या दाखवून लोक त्यांच्या व्हिडिओजचे व्ह्यूज आणि लाईक्स वाढवत आहेत. मात्र डोळे झाकून अशा बातम्यांवर विश्वास ठेऊ नये. जर तुम्हालाही अशा कोणत्याही बातम्या आढळल्या निश्चितपणे त्याचा तपास करूनच त्या पुढे पाठवा.