Fact Check: आयुष मंत्रालयाच्या वैज्ञानिक पॅनलचा कोविड-19 वरील आयुर्वेदिक औषध स्वीकारण्यास नकार? PIB ने सांगितले व्हायरल पोस्टमागील सत्य
Fake News on AYUSH Ministry (Photo Credits: PIB)

संपूर्ण देश कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाशी सामना करत असताना कोविड-19 संबंधित अनेक फेक न्यूज (Fake News) डोके वर काढू लागल्या आहेत. कोरोना संबंधित चुकीची माहिती, फेक न्यूज सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून वेगाने पसरत आहेत. यात अजून एका माहितीची भर पडली आहे. ही पोस्ट ट्विटरवर व्हायरल होत आहे. आयुष मंत्रालयच्या (AYUSH Ministry) सायन्टिफिक पॅनलमधील (Scientific Panel) काही लोक कोरोना व्हायरस वरील आयुर्वेदिक औषधांचा स्वीकार करत नाहीत, असा दावा या व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, आयुष मंत्रालयच्या सायन्टिफिक पॅनलमधील काही लोक कोरोना व्हायरस वरील आयुर्वेदिक औषधांचा स्वीकार करण्यास नकार देत आहेत. पतंजलि आयुर्वेदाची कोविड-19 वरील कोरोनील (Coronil) औषधाचा स्वीकार न करणारे हेच आयुष मंत्रालयातील पॅनल आहे. या फेक पोस्ट मागील सत्यता पीआयबीने (PIB) तपासली असता यात कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. तसंच आयुष मंत्रालयात अशाप्रकारचे कोणतेही सायन्टिफिक पॅनल नसल्याचे सांगत ही पोस्ट फेक आणि दिशाभूल करणारी असल्येच पीआयबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (ऑनलाईन काउंसलिंग, पदव्युत्तर जागा वाटपासंदर्भात आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र? व्हायरल झालेल्या पोस्टबाबत PIB ने केला खुलासा)

 Fact Check By PIB:

गेल्या आठवड्यात आयुष मंत्रालयाने एका मुसलमान डॉक्टरला निलंबित केल्याची फेक न्यूज सोशल मीडियावर व्हायरल होत होती. यात असे म्हटले होते की, पतंजलि आयुर्वेद द्वारा लॉन्च करण्यात आलेल्या कोविड-19 चे औषध कोरोनिल स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान कोविड-19 च्या संकट काळात अशा फेक न्यूज तुमचा गोंधळ अधिक वाढवू शकतात. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेज मागील सत्यता तपासल्याशिवाय कोणत्याही व्हायरल होणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पीआयबीकडून वारंवार करण्यात येत आहे.