Fact Check: सरकारी रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या मास्कमुळे लोक बेशुद्ध पडत आहेत? जाणून घ्या या व्हायरल ऑडिओमागील सत्यता
Fake News (Photo Credits: File Image)

देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) शिरकाव केल्यापासून याबाबत दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती पसरायला सुरुवात झाली आहे. म्हणूनच सरकार एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढा देत आहे. एकीकडे ते कोरोना संसर्ग नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे अशा खोट्या बातम्या थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोना महामारीला जवळपास दीड वर्ष होत आहे, परंतु याबाबतच्या अफवांमध्ये कमी झाली नाही. आता एका व्हायरल ऑडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, सरकारी रुग्णालयात वाटण्यात येणाऱ्या मोफत मास्कमुळे (Free Mask) लोक बेशुद्ध होत आहेत व बेशुद्ध लोकांना कोविड वॉर्डमध्ये दाखल केले जात आहे. हा ऑडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सरकारने हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे.

व्हायरल ऑडिओ मेसेजमध्ये मोठ्या डॉक्टरांचा संदर्भ देऊन दिशाभूल करणारा दावा केला आहे. मात्र या ऑडिओमध्ये डॉक्टरच्या नावाबद्दल आणि ते कोणत्या हॉस्पिटलशी संबंधित आहेत याबद्दल माहिती सांगितलेली नाही. ऑडिओमध्ये एक महिला सांगते, 'मोठ्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले आहे की, गरीब जनतेसाठी शासकीय व इतर रुग्णालयात मोफत मास्क वाटप केले जात आहे. परंतु हे मास्क लावल्यानंतर बहुतेक लोक बेशुद्ध पडत आहेत. त्यानंतर त्यांचे आरोग्य बिघडल्यास त्यांना कोरोना वॉर्डात दाखल केले जात आहे. त्यामुळे कोणीही मोफत मिळणारा मास्क घेऊ नये.’ तसेच हा ऑडिओ इतर लोकांना पाठवावा असे आवाहनही त्यात केले आहे. (हेही वाचा: Fact Check: केंद्र सरकार 10 कोटी लोकांना 3 महिन्यांसाठी देणार मोफत इंटरनेट सेवा? पीआयबीने केला खुलासा)

पीआयबी फॅक्ट चेकने या ऑडिओमध्ये केलेल्या दाव्याची सत्यता तपासली असता, हा दावा खोटा असल्याचे आढळले आहे. हा ऑडिओ खोटा असून त्याचा हेतू नागरिकांमध्ये भीती पसरवणे हा आहे. पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करुन हा ऑडिओ शेअर केला आहे. त्यांनी सांगितले आहे की, 'व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर केलेल्या या ऑडिमधील दावा पूर्णपणे तथ्यहीन आहे. असा मेसेज पुढे पाठवण्यापूर्वी किंवा कोणासोबत तो शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासून पहा.’