
‘डायर वुल्फ’ (Dire Wolves) हे नाव ऐकताच ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेतील भयंकर आणि निष्ठावान प्राणी डोळ्यासमोर येतात. पण हे प्राणी काल्पनिक नाहीत, तर खऱ्या जगात जवळपास 12,000 वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. डायर वुल्फ हे प्लाइस्टोसीन काळात, अमेरिकेच्या खंडात फिरणारे विशालकाय शिकारी होते. डायर वुल्फ घोडे आणि मॅमथ यांसारख्या प्रचंड प्राण्यांची शिकार करत असत, पण जेव्हा हे प्राणी नष्ट झाले, त्यानंतर डायर वुल्फही विलुप्त झाले. मात्र आता याबाबत निसर्गाची रहस्ये उलगडण्याच्या माणसाच्या उत्सुकतेने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. विज्ञानाने साधारण हे 12,000 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या महाकाय भयानक लांडग्यांना पुन्हा जन्म दिला आहे. कोलोसल बायोसायन्सेसच्या (Colossal Biosciences) धाडसी टीमने डीएनएद्वारे या प्राचीन प्राण्याला पुन्हा जिवंत केले आहे. आज हे लांडगे पुन्हा एकदा पृथ्वीवर गर्जना करत आहेत.
संशोधकांनी सोमवारी अहवाल दिला की, हे लांडग्याचे पिल्ले तीन ते सहा महिन्यांचे आहेत. त्यांचे केस लांब आहेत, मोठे व शक्तिशाली स्नायू असलेले जबडे आहेत आणि त्यांचे वजन सुमारे 80 पौंड आहे, जे प्रौढ झाल्यावर 140 पौंडांपर्यंत पोहोचेल. शास्त्रज्ञांनी प्राचीन डीएनए, क्लोनिंग आणि जीन-एडिटिंग तंत्रांचा वापर करून तीन लांडग्याचे पिल्लू तयार केले आहेत. संशोधनानुसार, हे तीन क्रूर लांडगे एका अज्ञात 2000 एकर जागेत राहतात, ज्याभोवती तीन मीटर उंच, प्राणीसंग्रहालयाच्या दर्जाचे कुंपण आहे, जिथे सुरक्षा कर्मचारी ड्रोन आणि लाईव्ह कॅमेऱ्यांच्या मदतीने त्यांचे निरीक्षण करतात. ही सुविधा अमेरिकन ह्यूमन सोसायटीने प्रमाणित केली आहे आणि अमेरिकेच्या कृषी विभागाकडे नोंदणीकृत आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे फक्त बाह्यतः डायर वुल्फसारखे दिसतात; त्यांचे वर्तन आणि शिकारी कौशल्य त्यांच्या प्राचीन पूर्वजांसारखे असणार नाही. ही पिल्ले जंगलात सोडली जाणार नाहीत, पण त्यांचा अभ्यास करून संशोधकांना प्राचीन प्राण्यांबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. याबाबत बफेलो विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ विन्सेंट लिंच म्हणाले की, तुम्ही सध्याचा काळात जीवाला वरवर पाहता दुसऱ्या जीवासारखे बनवू शकता, मात्र नामशेष झालेल्या प्रजाती पूर्णपणे पुनरुज्जीवित करणे शक्य नाही.’ (हेही वाचा: Talking Crow Viral Video: काळा कावळा.. काका करतो! 'आई', 'बाबा', 'ताई', 'दादा' अशी हाक मारतो)
जीवाश्मांमधून मिळालेल्या प्राचीन डीएनएचे परीक्षण करून शास्त्रज्ञांनी या भयानक लांडग्याचे विशिष्ट गुण शोधून काढले. संशोधकांनी ओहायोमध्ये उत्खनन केलेल्या 13,000 वर्ष जुन्या भयानक लांडग्याच्या दाताचा आणि आयडाहोमध्ये सापडलेल्या 72,000 वर्ष जुन्या कवटीच्या तुकड्याचा अभ्यास केला. त्यानंतर शास्त्रज्ञांनी एका जिवंत लांडग्याच्या रक्तपेशी घेतल्या आणि 20 वेगवेगळ्या ठिकाणी अनुवांशिकरित्या त्यांना सुधारित करण्यासाठी क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेस्ड शॉर्ट पॅलिंड्रोमिक रिपीट्स (CRISPR) चा वापर केला. हे एक जीन एडिटिंग तंत्र आहे.
त्यानंतर शास्त्रज्ञांनी या अनुवांशिक बाबी एका पाळीव लांडग्याच्या अंड्याच्या पेशीमध्ये हस्तांतरित केल्या. त्यानंतर गर्भ एका घरगुती लांडग्याच्या सरोगेट मातेकडे हस्तांतरित करण्यात आला. पुढे 62 दिवसांनंतर, अनुवांशिकरित्या सुधारित तंत्रांनी डायर वुल्फसारखे दिसणारे शावक निर्माण केले. या प्रयोगाने जगभरात चर्चा सुरू झाली आहे. काहींना हे डी-एक्स्टिंक्शन (विलुप्त प्रजाती पुन्हा जिवंत करणे) चे यश वाटते, तर काही तज्ज्ञ म्हणतात की, हे खरे डायर वुल्फ नाहीत, फक्त त्यांची प्रतिकृती आहे. मात्र काही शास्त्रज्ञांना शंका आहे की हे लांडगे खरोखरच उत्तर अमेरिकेच्या जंगलात पुन्हा राहू शकतील का. डायर वुल्फच्या या पुनर्जन्माने आपल्याला भूतकाळात डोकावण्याची संधी दिली आहे, आणि विज्ञान काय साध्य करू शकते, याची झलक दाखवली आहे.