सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी नवनव्या बातम्या, माहिती व्हायरल होत असते. त्यामुळे नेमके काय खरे काय खोटे हे समजणे कठीण होते. अशीच एक बातमी सध्या सोशल मीडियावर पसरवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दलचे एक पत्र फेसबुकवर (Facebook) व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी (Ram Mandir Construction) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी (UP CM Yogi Adityanath) यांना 50 कोटी रुपये दिले, असे म्हटले आहे. दरम्यान पीआयबीने (PIB) या व्हायरल PMO लेटरला उत्तर देत स्पष्टीकरण दिले आहे. (Ram Temple In Ayodhya: राम मंदिर ट्रस्टला आतापर्यंत मिळाले 41 कोटी रुपयांचे दान)
फेसबुकवर व्हायरल करण्यात आलेले पत्र हे युपी सीएम योगी आदित्यनाथ यांना पाठवण्यात आले आहे. या पत्रावर 7 ऑगस्ट ही तारीख असून शेवटी पीएम मोदी यांची स्वाक्षरी देखील आहे. यात पत्रात असे म्हटले आहे की, राम मंदिर बांधण्यासाठी उत्तर प्रदेशचे सीएम योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 50 कोटी रुपये देण्यात आले. तसंच यात उत्तर प्रदेश मध्ये हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा एजेंडा साध्य करण्यासाठी आणि 2022 साठी योगी आदित्यनाथ यांना शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. तसंच हे पत्र अधिकाधिक लोकांमध्ये व्हायरल करण्यास सांगितले जात आहे. परंतु, प्रेस इनफार्मेशन ब्यूरो (PIB)कडून या बातमीचे फॅक्ट चेक करण्यात आले.
Fact Check by PIB:
Claim: A Facebook user, has posted a letter, allegedly written by PM @narendramodi to Chief Minister of #UttarPradesh @myogiadityanath#PIBFactCheck: This letter is #Fake pic.twitter.com/9dHdcEEMu4
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 9, 2020
पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अशा कोणत्याही प्रकारचे पत्र जारी करण्यात आलेले नाही. तसंच हे पत्र केवळ सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यासाठी व्हायरल करण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले आहे. हे फेक पत्र व्हॉट्सअॅपवर ऑडिओ रेकॉर्डिंगसह व्हायरल केले जात असून स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा फडकवण्यापासून रोखा, असे भारतीय मुसलमानांना सांगितले जात आहे. दरम्यान अशा प्रकारचे प्रक्षोभक मेसेज पाठवून वातावरण तणावपूर्ण करु नये. तसंच कोणत्याही मेसेजची सत्यता तपासल्याशिवाय सोशल मीडियावर शेअर करु नका.