
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिर (Ram Temple In Ayodhya) निर्माणसाठी श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे (Shri Ram Mandir Trust) आतापर्यंत 41 कोटी रुपयांचे दान देनगी रुपात प्राप्त झाले आहे. यामध्ये विविध धर्मगुरुंनी दिलेल्या दानाचा समावेश नाही. ज्यात परमार्थ निकेतनचे स्वामी चिदानंद सरस्वती, जूना अखाडाचे स्वामी अवधेशानंद गिरी, बाबा रामदेव आणि काल राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेक व्यक्तिमत्त्वांनी दिलेल्या दानाचा समावेश नाही. ट्रस्ट कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी ( Swami Govind Dev Giri) यांनी ही माहिती दिली.
श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी जेव्हा मिळालेल्या दानाबाबत शेवटची माहिती घेतली तेव्हा ट्रस्टकडे असलेले दान सुमारे 30 कोटी रुपये इतके होते. त्यात मोरारी बाबू यांच्याकडून 11 कोटी रुपयांचे दान मिळाले. त्यामुळे ही रक्कम वाढून 41 कोटी इतकी झाली आहे. दरम्यान, यात बुधवारी प्राप्त झालेल्या दानाचा समावेश नाही. स्वामी गोविंद देव गिरी यांनी माहिती देताना पुढे सांगितले की, कोरोना व्हायरस संकटामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. या काळातही अनेकांनी मंदिर निर्माणासाठी दान दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निकालानंतर अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर अयोध्येत काल (5 ऑगस्ट 2020) राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमही पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेत अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन झाले. पंतप्रधानांनी चांदीची विट रचून भूमिपूजनास प्रारंभ केला. या सोहळ्याला देशभरातून काही मोजकेच लोक उपस्थित होते.