Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

सीबीएसई (CBSE) 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 10 वी आणि 12 वी टर्म-1 बोर्ड परीक्षा घेत आहे. आता सोशल मिडियावर एक बातमी व्हायरल होत आहे की, अकाऊंटन्सीच्या पेपरला बसलेल्या इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांना 6 गुण ग्रेस मार्क्स (Grace Marks) म्हणून दिले जातील. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्येही हे दाखवले जात आहे. सीबीएसई बोर्डाचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांना एक ऑडिओ संदेश पाठवून ही माहिती दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.

अहवालात म्हटले आहे की, 'सीबीएसईने सांगितले आहे बारावीच्या लेखा परीक्षेत (टर्म 1) विचारलेल्या प्रश्नांमधील काही चुकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ झाला होता. ही गोष्ट लक्षात घेऊन बोर्डाने 6 गुणांपर्यंत वाढीव गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही 28 ते 31 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली असतील तर तुम्हाला 38 गुण मिळतील. सीबीएसई 5 ते 6 गुणांचे ग्रेस मार्क्स देईल.’ यासोबतच मुख्याध्यापकांना पाठवलेल्या ऑडिओ संदेशात संयम भारद्वाज यांनी विद्यार्थ्यांना काळजी करू नका असे सांगितले आहे.

व्हायरल मेसेजमध्ये सीबीएसई 12 वी अकाऊंटन्सीची प्रश्नपत्रिका धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. परीक्षेच्या पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांना 55 पैकी 45 प्रश्न सोडवायचे होते, मात्र पेपरमध्ये विद्यार्थ्यांना 48 पैकी 40 प्रश्न देण्यात आले. पॅटर्नमधील बदल विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक होता, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वेही प्रश्नपत्रिकेत नीट देण्यात आली नव्हती, असेही यात म्हटले आहे.

अशा बातम्या समोर आल्यानंतर सीबीएसईने ही केवळ फेक न्यूज असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना खोट्या बातम्यांविरोधात जागरूक राहण्यास सांगितले आहे. सीबीएसई बोर्डाने एक नोटीस जारी केली आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या अहवालांमध्ये केलेले हे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे. बोर्डाने म्हटले आहे की, सीबीएसई परीक्षा नियंत्रकाचे हे ऑडिओ संदेश आणि ग्रेस मार्क्सबाबत व्हायरल होणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. सीबीएसईने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. (हेही वाचा: Mumbai School Reopen: मुंबईतील शाळा उद्यापासुन सुरु, पहिली ते सातवीचे वर्ग भरणार)

बोर्डाने काल म्हणजेच 13 डिसेंबर रोजी इंग्रजी कॉम्प्रिहेन्शन पॅसेजच्या प्रश्नांसाठी सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण गुण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही खोटी बातमी समोर आली आहे.