फॅक्ट चेक । PC: Twitter/ PIB Fact Check

सोशल मीडीयामध्ये आजकाल खोट्या बातम्या अर्थात फेक न्यूज झपाट्याने वायरल होत असतात. त्यामुळे फोनवर आलेल्या कोणत्याही मेसेजवर थेट विश्वास न ठेवता तुम्ही अधिकृत सूत्रांकडून दुजोरा मिळालेल्या बातम्यांना फॉरवर्ड करण्याला आणि अशाच वृत्तांवर विश्वास ठेवण्यामध्ये शहाणपण आहे. सध्या लॉकडाऊन, कोविड 19 जागतिक महामारीमुळे सारंच ऑनलाईन झाल्याने सायबर फ्रॉड, आणि सायबर गुन्हेगारीचं प्रमाण देखील वाढलं आहे. अशामध्येच खोट्या बातम्या पसरवून आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीवर डल्ला मारण्याचे प्रकार वाढले आहेत.

दरम्यान सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत असलेला एक मेसेज म्हणजे 'प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना' अंतर्गत तरूणांना दरमहा 3500 रूपये मिळतात असा दावा केला जात आहे मात्र तो खोटा आहे. पीआयबी फॅक्ट चेक कडून हा वायरल मेसेज खोटा असल्याचं सांगण्यात आलं आहे. ट्वीट करत पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारकडून अशी कोणतीही योजना नाही तसेच अनोळखी लिंक वर क्लिक न करण्याचेही त्यांचे आवाहन आहे. Scam Alert: कोरोना फंड अंतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून 5000 रूपये दिले जात असल्याचा खोटा मेसेज वायरल; PIB Fact Check ने केला खुलासा.

पीआयबी फॅक्ट चेक

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांच्या मनातील भीतीचा गैरफायदा घेत अनेक समाजकंटकांनी खोटी वृत्त वायरल करून बनावट लिंक शेअर करून सामान्यांची लूट केल्याची प्रकरणं समोर आली आहेत त्यामुळे तुम्ही देखील या फासामध्ये अडकू नये म्हणून सतर्क राहणं गरजेचे आहे. सरकारी यंत्रणांकडून किंवा अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा असं आवाहन करण्यात आले आहे. आता तुमच्याकडे आलेले मेसेज खरे आहेत की खोटे हे देखील तपासून पाहण्यासाठी सोशल मीडीयात अनेक सुविधा उपलब्ध आहेत.