50 Most Influential People: ट्वीटरवरील 50 सर्वात प्रभावशाली लोकांची यादी जाहीर; PM Narendra Modi, Sachin Tendulkar, Nick Jonas, Beyonce यांना मिळाले स्थान
सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty Images)

जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सुमारे 8 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले असले तरी, त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. कंझ्युमर इंटेलिजेंस कंपनी ब्रँडवॉचच्या वार्षिक संशोधनानुसार, भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर या वर्षी ट्विटरवरील 50 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या (Most Influential People) यादीत सामील झाला आहे. सचिनने या 50 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत अमेरिकन अभिनेता ड्वेन जॉन्सन आणि लिओनार्डो डिकॅप्रियो तसेच अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्यापेक्षा वरचे स्थान पटकावले आहे.

या यादीत अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट पहिल्या क्रमांकावर आहे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या स्थानावर आहेत. अशाप्रकारे नेत्यांमध्ये मोदी हे पहिल्या क्रमांकावर आहेत. 48 वर्षीय सचिनने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत, ज्यापैकी काही मोडणे अशक्य आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके झळकावली आहेत. भारताचा माजी कर्णधार तेंडुलकर, जो राज्यसभेचा सदस्य देखील आहे, एक दशकाहून अधिक काळ युनिसेफशी जोडला गेला आहे.

2013 मध्ये त्याला दक्षिण आशियाचे दूत म्हणून नियुक्त करण्यात आले. सचिन तेंडुलकरने ग्रामीण आणि शहरी भारतातील आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक उपक्रमांना पाठिंबा दिला आहे. या यादीमध्ये पहिल्यांदाच सचिनसोबत निक जोनास, निकी मिनाज, बियॉन्से, लियाम पायने, लुई टॉमलिन्सन, ब्रुनो मार्स आणि ताकाफुमी होरी यांना स्थान मिळाले आहे. यंदा मोदी आणि बराक ओबोमा अशा दोनच नेत्यांना Top 10 मध्ये स्थान मिळाले आहे. (हेही वाचा: सचिन तेंडुलकरच्या लेकीने शेअर केले दिवाळी निमित्त ग्लॅमरस फोटो, पाहा)

दरम्यान, सचिन तेंडुलकरने 14 नोव्हेंबर 1987 रोजी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, त्यावेळी त्याच्यासाठी तो केवळ एक पर्याय होता. डिसेंबर 1988 मध्ये त्याने खरे पदार्पण केले आणि पदार्पणाच्या सामन्यात नाबाद 100 धावा केल्या. 1989 मध्ये सचिनने पाकिस्तानविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दोन्ही फॉरमॅटमध्ये भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. 1996 च्या विश्वचषकात सचिनने सर्वाधिक धावा केल्या होत्या. 2003 च्या विश्वचषकातही तो सामनावीर ठरला होता.