Coronavirus | Photo Credits: Twitter/ ANI

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गामुळे परभणी (Parbhani) जिल्ह्यात 7 दिवसांकरिता कडक लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊन लागून दोन दिवस उलटले नाहीत तर, दुकानदार, छोटे व्यापारी आणि रिक्षा चालकांकडून लॉकडाऊनला विरोध होऊ लागला आहे. एवढेच नव्हेतर, दंडात्मक कारवाईलाही सामोरे जाण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. दरम्यान उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांना व्यापाऱ्यांनी निवेदन दिले असून लॉकडाउन त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी व्यापारी करत आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा काटेकोरपणे वापर करणे, वारंवार हात स्वच्छ धुणे आणि सोशल डिस्टसिंगचा पालन करू, असे आश्वासनही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यात भारतात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले होते. परिणामी, देशात व्यापार, व्यवसाय, वाहतूकींसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या होत्या. या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावा लागले होते. मात्र, आता पुन्हा जिल्ह्यात लॉकडाउन लागू केल्यानंतर दुकानदार, छोटे व्यापारी, रिक्षा चालकांसह सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तर व्यवसाय असाच ठप्प राहिला तर करायचे काय? असा प्रश्न या लोकांपुढे निर्माण झाला आहे. हे देखील वाचा- Coronavirus In Nagpur : नागपूर शहरात गेल्या 24 तासात 4095 जणांना कोरोना संसर्ग

कोरोनाचा वाढता धोका पाहता जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी 24 मार्च रोजी परभणी जिल्ह्यात 7 दिवसांकरीता लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानुसार, सायंकाळी 7 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत सर्व बंद ठेवण्यात आले आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. याशिवाय, किराणा माल घरपोच विक्री करणे, दूध विक्रीसाठी सकाळी 6 ते 9 या वेळ मर्यादा आखून देण्यात आली आहे. अँटीजेन, आरटीपीसीआर तपासणी, लस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना सूट देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात काल (25 फेब्रुवारी) 35 हजार 952 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, नवीन 20 हजार 444 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 22 लाख 83 हजार 037 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2 लाख 62 हजार 685 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.78% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री यांनी दिली आहे.