Hemant Nagrale | (Photo Credits: Facebook)

काही दिवसांपूर्वी मुंबईतील (Mumbai) साकीनाका (Sakinaka) परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार (Rape) करून तिच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. या महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. या बलात्कार प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर आधीच टीका होत असताना, पोलीस आयुक्तांनी दिलेल्या वक्तव्याने त्यात आणखी भर पडली आहे. बलात्कार आणि हत्येच्या घटनेवर मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने, प्रत्येक घटनेवेळी पोलीस उपस्थित राहू शकत नाहीत, असे म्हटले होते. आता आयुक्त हेमंत नगराळे यांनी या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.

ते म्हणाले की माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला. मी म्हटले होते की प्रत्येक घटनेच्या ‘ठिकाणी’ पोलीस उपस्थित राहू शकत नाहीत. मात्र प्रत्येक घटनेच्या ठिकाणी पोलीस पोहोचू शकतील याची खात्री आहे. ते पुढे म्हणाले की साकीनाका प्रकरणामध्ये आम्ही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचलो होतो. या प्रकरणाबाबत माहिती देताना त्यांनी पुढे सांगितले की, पीडित महिला अनुसूचित जातीची असल्याने साकीनाका पोलिसांनी यामध्ये एससी-एसटी (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याची कलमे जोडली आहेत.

नगराळे म्हणाले, ‘आरोपींनी वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले. पिडीत महिलेच्या संपूर्ण शरीरावरील जखमा, हेच मृत्यूचे मुख्य कारण आहे. ते पुढे म्हणाले की, रात्रीच्या वेळी रस्त्यावर कमी गर्दी किंवा लोकवस्ती असलेल्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवली जाईल. रात्री एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना रात्रीच्या गस्त घालणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मदत दिली जाईल.’

दरम्यान, साकीनाका येथे महिलेवर बलात्कार होऊन त्यानंतर तिच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी एकूणच पोलिसांनी त्वरेने सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समाधान व्यक्त केले आहे. या प्रकरणामध्ये प्रसिद्ध वकील राजा ठाकरे यांची तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे. (हेही वाचा: 'साकीनाक्याच्या घटनेने राज्य हादरून गेले, मात्र मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर'- Shiv Sena)

दरम्यान, ही घटना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. मुंबई शहरात 5 हजार सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून 7 हजार कॅमेरे बसविणे सुरु आहे अशी माहिती देऊन सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील म्हणाले की, शहरातील सर्व मॉल्स, संस्था, दुकाने यांना रस्त्याच्या दिशेकडील कोनात कॅमेरे बसविणे आवश्यक करण्यात आले आहेत. अशारीतीने शहरात सुमारे 50 हजाराच्यावर कॅमेरे कार्यरत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.