नुकतेच मुंबईच्या (Mumbai) साकी नाका (Sakinaka) परिसरात घडलेल्या बलात्काराच्या (Rape) घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या 32 वर्षीय पिडीतेवर बलात्कार करून तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घालण्यात आला होता. आता या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालय प्रशासनानेही पीडितेच्या मृत्यची पुष्टी केली आहे. या घटनेनंतर राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरु असून, विरोधी पक्षाने महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत सरकार कुचकामी ठरल्याचे म्हटले आहे. त्यावर शिवसेनेने सोमवारी म्हटले की, या महिलेवर झालेला क्रूर बलात्कार आणि हत्येने सर्वांना हादरवून सोडले, मात्र मुंबई हे महिलांसाठी जगात ‘सुरक्षित शहर’ आहे, याबाबत कोणाच्याही मनात शंका नसावी.
ही बलात्काराची घटना शुक्रवारी मुंबईतील साकी नाका परिसरात घडली. येथील खैराणी रोडवर 32 वर्षीय महिलेवर प्रथम बलात्कार करण्यात आला आणि नंतर आरोपीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला. महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे शनिवारी तिचा मृत्यू झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले, जिथे न्यायालयाने त्याला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घटना मानवतेला काळीमा असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, तसेच खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करून न्यायालयीन खटला तयार करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. (हेही वाचा: Sakinaka Rape and Murder Case: राज्य सरकार कडून पीडीतेच्या कुटूंबाला 20 लाखांची मदत)
आजच्या सामना अग्रलेखामध्ये शिवसेनेने म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य असून असे निर्घृण कृत्य करणारे नराधम कायद्याच्या कचाटय़ातून सुटणार नाहीत. तरीही या सर्व प्रकरणावर राज्यातील विरोधी पक्षाने गदारोळ माजवला आहे. राज्यात कायद्याचे राज्य नाही, कायद्याचा धाक नाही, अशी भाषा विरोधकांनी वापरली आहे. भारतीय जनता पक्षाने या प्रकरणात विरोधी पक्षाची जी काही भूमिका आहे ती चोख बजावली आहे. मुंबई-महाराष्ट्रात महिला कशा सुरक्षित नाहीत असे तो आता ओरडून सांगत आहे. साकीनाक्याच्या घटनेने सगळय़ांनाच धक्का बसला असला तरी मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही.’
पुढे म्हटले आहे, ‘उत्तर प्रदेशातील हाथरस येथे त्या मुलीवर बलात्कार करून मारून टाकणाऱयांना राजाश्रय होता व आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. त्या पीडित मुलीचा मृतदेह सरकारने घाईघाईने जाळून पुरावाच नष्ट केला व तिच्या कुटुंबापर्यंत कोणालाच पोहोचू दिले जात नव्हते. हाथरस प्रकरणात ‘बलात्कार झालाच नाही हो!’ असे योगींचे सरकार सांगत होते, ते शेवटी खोटे ठरले. राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक साकीनाका प्रकरणात ज्या तातडीने मुंबईत पोहोचले, ती तत्परता या आयोगाने हाथरसप्रकरणी दाखवली नव्हती. 'कठुआ' बलात्कार प्रकरणातही बलात्काराचे समर्थन करण्यासाठी एका राजकीय पक्षाचे लोक रस्त्यावर उतरले होते. कायद्याचा धाक नाही असे म्हणायचे असेल तर ते या अशा प्रकरणांत म्हणावे लागेल. साकीनाका प्रकरणात पोलिसांनी 10 मिनिटांत आरोपीस गजाआड करून कायद्याचा धाक काय असतो ते दाखवून दिले.’