केवळ चहा मिळाला नाही येवढ्या कारणासाठी डॉक्टरने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया (Family Planning Surgery) अर्धवट सोडल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता महिलेच्या प्रसूती (Woman's Delivery) दरम्यान रुग्णालयातील पाणीसाठा संपल्याने महिलेला आणिबाणीच्या परिस्थितीत दुसऱ्या रुग्णालयात दाखल करावे लागल्याची घटना घडली आहे. नाशिक शहातील बिटको रुग्णालयात (Bytco Hospital Nashik) ही घटना घडली आहे. घडल्या प्रकारामुळे नाशिक शहर व्यवस्थापण, प्रशासन आणि व्यवस्थेची नाचक्की झाली आहे. महापालिका कार्यकाळाची मूदत संपून आता जमाना झाला. त्यामुळे शहराला ना महापौर आहे ना नगरसेवक. अशा स्थितीत केवळ प्रशासकाच्या जीवावर कारभार हाकणाऱ्या सरकारमुळे अशी परिस्थीती निर्माण झाल्याची चर्चा नागरिक करत आहेत.
नाशिक येथील बिटको रुग्णाल समस्याग्रस्त
नाशिक रोडवर असलेले बिटको रुग्णालय पाठिमागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांचा सामना करत आहेत. या समस्यांमध्ये आता पाणीटंचाईची भर पडली आहे. मटा ऑनलाईनने दिलेल्या वृत्तानुसार, जेलरोड परिसरात राहणाऱ्या शिवानी कनकुटे या गर्भवती महिलेला डॉक्टारांनी प्रसूतीची तारीख दिली होती. त्यानुसार 23 वर्षांची ही महिला आपल्या पतीसोबत बिटको रुग्णालयात दाखल झाली होती. रुग्णालयातील डॉक्टरांची तिची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करुन घेत असल्याची कागदपत्रेही तयार केली. मात्र, तीची प्रसूती गुंतागुंतीची असल्याचे सांगित डॉक्टरांनी तिला नाशिक शहरापासून जवळपास 30 किलोमीटर दूर असलेल्या एसएमबीटी रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. प्रसूतीचा अनुभव पहिल्यांदाच घेत असलेली ही महिला आगोदरच घाबरली होती.
पाणीटंचाई चिंतेचा विषय
रुग्णालयाने प्रसूतीतील गुंतागुंत हे कारण दिले असले तरी, खरे कारण रुग्णालयात असलेली पाणी टंचाई असल्याचे पुढे आले आहे. हे रुग्णालय एसएमबीटी रुग्णालयात जात असताना त्यांची माजी नगरसेवक जगदीश पवार यांच्यासोबत भेट झाली. त्यांनी दोघांनाही वरिष्ठ डॉक्टरांकडे पाहिले. डॉक्टरांनी तपासणी करुन या महिलेला दाखल करुन घेण्याचे आदेश कनिष्ठ डॉक्टरांना दिले. मात्र, पुन्हा डॉक्टरांकडे परत गेलेल्या या जोडप्याला पाणीटंचाई व प्रसूतीशी संबंधित कारणे असल्याचे सांगत पुन्हा एसएमबीटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
पाणीटंचाईचा भांडाफोड होताच प्रशासनाची धावपळ
दरम्यान, रुग्णालयात पाणीटंचाई असल्याची माहिती पुढे येताच प्रशासनाने धावपळ केली. टँकरची जमवाजमव करुन उद्यान विभागाकडून पाणी मिळवले. ते पाणी टाकीत सोडले. मात्र, घाबरलेल्या जोडप्याने बिटको रुग्णालयात प्रसूती करुन घेण्याऐवजी एसएमबीटी रुग्णालयालाच पसंती दिली. महिलेची प्रसूतीला सामोरे जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याने जोडप्याने कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारणे टाळले. घडल्या प्रकारामुळे रुग्णालयाची अब्रू मात्र वेशीवर टांगली गेली आहे.