
Buldhana News: डॉक्टरांच्या गलथान कारभारामुळे एका महिलेचे मातृत्व हिरावले गेले आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात ( Buldhana District Hospital) हा प्रकार घडला आहे. सहा महिन्याची गर्भवती महिला (Pregnant Woman) गर्भ पिशवीला टाके घालून घेण्यासाठी डॉक्टरांच्याच सल्ल्याने रुग्णालयात आली होती. या वेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरने महिलेला गर्भपिशवीला टाके घालायचे सोडून चक्क तिला गर्भपाताची औषधे दिली. ज्याचा परिणाम होऊन सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या या महिलेचा गर्भपात (Miscarriage) झाला. तिला आपले बाळ गमवावे लागले. घडल्या प्रकारामुळे रुग्णाचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना धारेवर धरले आणि दोषी डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
डॉक्टरांचा निष्काळजीपणा
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेला डॉक्टरांचा निष्काळजीपणा परिसरात चिंतेचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, महिला सहा महिन्यांची गर्भवती होती. तिचा नैसर्गिक गर्भपात टाळण्यासाठी डॉक्टरांनी गर्भाशयाला टाके घलण्याचा सल्ला दिला होता. त्यावरुन ही महिला रुग्णालयात आली होती. मात्र, इथे तिच्यासोबत भलतीच घटना घडली. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला योग्य आकलन न झाल्याने त्यांनी चक्क तिला गर्भपाताची औषधे दिली. ज्यामुळे तिचा गर्भपात झाला आणि तिच्या सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Nagpur Crime News: संतापजनक! एक कप चहा मिळाला नाही म्हणून डॉक्टरने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया सोडली अर्धवट)
गर्भपात टाळण्यासाठी गर्भाशयाला टाके घालून घेण्याचा सल्ला
विद्या वाघ असे या विवाहीत महिलेचे नाव आहे. त्या सहा महिन्यांच्या गर्भवती होत्या. वैद्यकीय तपासणीसाठी त्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. रुग्णालयातील डॉक्टरांनीत्यांची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीवेळी डॉक्टरांच्या लक्षात आले की, महिलेच्या गर्भाशयाच्या पिशवीचे तोंड उघडले आहे. ते असेच उघडे राहून थोडे मोठे झाले तर तिचा नैसर्गिक गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य धोका आणि अडचणी टाळण्यासाठी त्यांनी या महिलेला गर्भाशयाला टाके घालून घेण्याचा सल्ला दिला. त्यावरुन हे टाके घालून घेण्यासाठी विद्या वाघ या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.
डॉक्टरांना आकलन न झाल्याने गर्भपाताची औषधे
महिला रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, डॉक्टरांना आकलन न झाल्याने त्यांनी महिलेला गर्भाशयाला टाके घालण्याऐवजी चक्क गर्भपाताची औषधे दिली. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. या प्रकारावरुन नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांना धारेवर धरले. या वेळी डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले की, असा काही प्रकार घडला असेल तर ते अतिशय गंभीर आहे. घटनेची चौकशी करुन आवश्यक ती कारवाई केली जाईल. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अश्वासनानंतरही नातेवाईकांकडून संताप व्यक्त होतच होता.