नागपूर (Nagpur Crime News) येथील एक डॉक्टर भलत्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट पाहायला मिळत आहे. या डॉक्टर महोदयांनी म्हणे शस्त्रक्रिया सुरु असताना लहान मुलासारखा प्रकार केला. महिलेवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया (Family Planning Surgery) सुरु होती. शस्त्रक्रिया सुरु असताना डॉक्टरांना चहाची तल्लफ आली. काही कारणांनी त्यांना चहा-बिस्किटे मिळाली नाहीत. केवळ येवढ्या कारणांमुळे चिडलेल्या डॉक्टरांनी चक्क शस्त्रक्रिया अर्धवट सोडल्याचे वृत्त आहे. नागपूर (Nagpur District) जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समजते.
अधिक माहिती अशी की, शस्त्रक्रियेची सर्व तयारी पूर्ण झाली होती. रुग्णांना भूल (अॅनेस्थिशिया) सुद्धा देण्यात आली होती. सर्व स्टाफला केवळ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुरु करण्याची प्रतिक्षा होती. असे असताना डॉक्टरांनी केलेल्या अनपेक्षीत वर्तनाने सर्वांचीच धावपळउडाली. तर रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. डॉक्टरांनी इतके बेशिस्त वर्तन केले की, ते रुग्णांकडे न फिरकता तडकाफडकी निघून गेले.
डॉक्टरांनी केलेल्या विचित्र वर्तनाचा नाहक त्रास महिला रुग्णांना सहन करावा लागला. प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी (3 नोव्हेंबर) ही घटना घडली. घडल्या प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनाकडे रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रार केली. तसेच, प्राप्त तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी कुंदा राऊत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
डॉक्टरांकडून प्रसारमाध्यमांकडे आलेल्या सफाईमध्ये म्हटले आहे की, चहावरुन गोंधळ करणाऱ्या डॉक्टर भलावी यांना शुगरचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना बिस्कीटांची आवश्यकता होती. त्यांना वेळेत चहा बिस्कीट उपलब्ध न झाल्याने आपण तिथून निघून गेल्याचे डॉ. भलावी यांनी म्हटले आहे. दरम्यान, डॉ. भलावी निघून गेले असले तरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने व्यवस्था करत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दुसऱ्या डॉक्टरांना पाचारन केले आणि नियोजित शस्त्रक्रिया पार पाडल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील डॉक्टर अनेकदा या ना त्या कारणांनी चर्चेत असतात. कधी त्यांना झालेल्या मारहाणीमुळे. कधी त्यांनी चालविलेल्या रॅकेट आणि चुकीच्या उपचारबद्धतीमुळे. कधी मार्डद्वारा विविध कारणांनी सुरु करण्यात आलेल्या संपामुळे. अशा प्रकारची विविध कारणे नेहमीच चर्चेत असली तरी, डॉ. भलावी यांनी केलेले वर्तन डॉक्टरी पेक्षावर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. त्यांच्या या कृत्याचा समाजातून जरदार निषेध केला जातो आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये रुग्णांवरील उपचार हिच प्राथमिकता असते. असे असताना डॉक्टर असे वागूच कसे शकतात, असा संतप्त सवाल विचारला जातो आहे.