लोकसभा निवडणूक 2014 मध्ये काँग्रेस मोठ्या प्रमाणावर पराभूत झाली आणि पराभूतच होत गेली. अपवाद वगळता काँग्रेसला नंतर पुढे कधीच स्वबळावर सत्ता सोडा फारसे उमेदवारही निवडूण आणता आले नाहीत. लोकसभा, विधानसभा ते थेट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हिच स्थिती पाहायला मिळाली. आजही तीच परंपरा कायम आहे. दरम्यान, महाराष्ट्रात राजकीय फेरबदल झाले आणि महाविकासआघाडीच्या रुपात बुडत्या काँग्रेसला सत्तेचा किनारा मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने काँग्रेस सत्तेत स्थिरावली. महाविकासआघाडीचे हे गलबत पुढेही असेच मार्गक्रमण करणार असा अनेकांचा कयास असतानाच काँग्रेस पक्षाला स्वबळाची हुक्की आली आणि त्यांनी हाक दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणका पक्ष स्वबळावर लढेल असे विधान केले. लागलीच मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांनीही तीच री ओढली. अर्थात भाई जगताप आगोदरपासूनच अशी भूमिका घेताना दिसत होते. काँग्रेसच्या या वर्तनावरुन सध्या तरी काँग्रेस महाराष्ट्रात आक्रमक झाल्याचे दिसते खरे. पण, खरोखरच महाराष्ट्रात काँग्रेसच्या हाताला स्वबळाचा सूर गवसणार का?
विधान, संभ्रम आणि कलगीतुरा
नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला. या स्वबळाच्या नाऱ्याची नवलाई संपण्यापुर्वी महसूलमंत्री स्वबळावर निवडणूक लढण्याबबतचा निर्णय झाला नसल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटले. नंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हाच काँग्रेसचा कार्यक्रम असेल असेही या नेत्याने सांगितले. दरम्यान, त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सूचक विधाने करायला सुरुवात केली. दस्तुरखुद्द शरद पवार यांनीही भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढू शकतील असे संकेत पक्षाच्या वर्धापन दिनी दिले. तर शिवसेना मुखपत्र दैनिक सामना संपादकीयातूनही शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र लढावेत अशी दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाची भावना दिसते असे म्हटले. दरम्यान, शिवसेनेने काँग्रेसला सल्ला दिला की, स्वबळावर जरुर लढा. पण आधी संभ्रमातून बाहेर या. (हेही वाचा, भाजपला पाहिजे नवा भिडू! शिवसेना, राष्ट्रवादी की काँग्रेसलाच फोडू? महाराष्ट्रात राजकारण तापलं, राजकीय गाठीभेटींना वेग)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
दरम्यान, नाना पटोले हे केवळ स्वबळाबाबत विधान करुनच थांबले नाहीत. तर त्यांनी तसे कामही सुरु केले आहे. नाना पटोले हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथून ते हा दौरा सुरु करत आहेत. केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन नव्या कृषी कायद्याची होळी करुन ते हा दौरा सुरु करतील. ते धुळे, नंदुरबार आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्यालाही भेट देणार आहेत. पक्षातर्फे सुरु असलेल्या मदत कार्याचा आणि संघटनात्मक कामाचा ते आढावा घेणार आहेत. नाना पटोले यांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम पांडे हेदेखील असणार आहेत. 26 जून रोजी नाशिक येथे हा दौरा समाप्त होईल.
काँग्रेसला गवसणार सूर?
लोकसभा निवडणूक 2014 पासून हरवलेला सूर काँग्रेसला अद्याप गवसला नाही.अद्याप काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वालाच म्हणावा तसा सूर न गवसल्याने सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नेतेही संभ्रमात आहेत. त्यामुळे नेमकी भूमिका कोणी आणि काय घ्यावी याबाबत नेहमीच संभ्रम आढलतो आहे. काँग्रेसचे अपवाद नेते वगळता बहुतांश लोक हे केवळ पक्षाच्या महत्त्वाच्या पदावरील खुर्च्या अडवून बसले आहेत. त्यामुळे पक्षासमोर सत्तेतील पुनरागमन सोडा आहे तो कार्यकर्ताही टीकवणे मुश्कील झाले आहे. अशा काळात जर महाराष्ट्र काँग्रेस नेतृत्व आक्रमक भूमिका घेत राज्यभर फिरत असेल. कार्यकर्ता जोडण्यासाठी, टीकवून ठेवण्यासाठी आणि नव्या उत्साहाने काम करत असेल तर ते चांगलेच आहे. काँग्रेसी राजकारणात प्रामुख्याने दरबारी राजकारणात नाना पटोले यांना किती यश मिळते याची महाराष्ट्रालाही उत्सुकता आहे. नाना पटोले यांचा एकूण स्वभाव, नेतृत्वशैली आणि भूमिका पाहता काँग्रेसला महाराष्ट्रात सूर गवसू शकते अशी अनेकांना आशा आहे.