भाजपला पाहिजे नवा भिडू! शिवसेना, राष्ट्रवादी की काँग्रेसलाच फोडू? महाराष्ट्रात राजकारण तापलं, राजकीय गाठीभेटींना वेग
Politics of Maharashtra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Politics of Maharashtra) होत असलेल्या राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी पाहता राज्यात नेमके चाललंय तरी काय असा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकेल. एका बाजूला विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटतात. शरद पवार यांना भेटायला प्रसिद्ध राजनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor येतात. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या स्वतंत्र भेट होते. मध्येच बातमी येते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप (BJP) आणि देशाचे सर्वोच्च नेते. या सगळ्या गोष्टी नेमक्या सांगतात तरी काय?

महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या गाठीभेठी वाढल्या आहेत. यात राजकारण आहेच. त्याही पेक्षा दबावनीती आणि गोष्टी आपल्या बाजूने वळविण्यासाठी टाकलेले डावपेच अधिक आहेत. एकमेकांची साथ तर कोणालाच सोडायची नाही. परंतू, एकमेकांची साथ कायम ठेऊनही प्रत्येकाला नवा घरोबा करायचा आहे किंवा नवा भिडू शोधायचा आहे. हा प्रकार म्हणजे एकासोबत संसार करत असताना गरज पडल्यास असावे म्हणून दुसऱ्यावर डोळा ठेवण्यासारखे आहे. म्हणजे असे की, महाराष्ट्र भाजपला सत्तेत यायचे आहे. त्यासाठी भाजपचे नेते जंग जंग पछाडत आहे. परंतू, दिल्लीश्वरांच्या मनात सध्या तरी असे काही दिसत नाही. म्हणजे दिल्ली भाजपला महाराष्ट्रात सत्ता हवी आहे. परंतू, स्थानिक नेतृत्वाचा फुगा आवश्यकतेपेक्षा जास्त फुगू द्यायचा नाही. परिणामी देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न एका विशिष्ट टोकाला जाऊन तोकडे पडतात. शिवसेना हा नैसर्गिक मित्र पण या मित्राच्या आपेक्षा पाहता त्याला सांभाळणे महाराष्ट्र भाजपला आताच्या काळात काहीसे कठीण. त्यामुळे राष्ट्रवादी सोबत सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

पवार आणि फडणवीस भेट

राष्ट्रवादी सोबत सत्तेसाठी दिल्लीश्वरांची पसंती मिळू शकते. परंतू, महाराष्ट्र भाजपसाठी राष्ट्रवादीसोबत सत्ता मिळवायची म्हणजे एकाच म्यानात दोन तलवारी ठेवण्यासारखे. अन्यथा पहाटेच्या शपथविधीचा संसार मोडलाच नसता किंवा गेल्या 18 महिन्यात तो पुन्हा जोडताना दिसला असता. त्यामुळे विषय काही जरी असला तरी भाजप नेतृत्व आपण आजही राष्ट्रवादीच्या आणि राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या संपर्कात आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसते. प्रामुख्याने फडणवीस आणि पवार यांची भेट या दृष्टीकोनातून पाहायला हवी. भाजपचे सर्वोच्च आणि राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेतृत्व गुप्तपणे भेटल्याच्या बातम्याही मध्यंतरी आल्याच होत्या. (हेही वाचा, NCP अध्यक्ष शरद पवार घेतायत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा?)

Devendra Fadnavis | (Photo Credit: Twitter)

मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी भेट

विविध विषयांच्या अनुषंघाने महाविकासआघाडी सरकारचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले. या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. परंतू, याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात स्वतंत्र बैठक झाली. अर्थातच या बैठकीची चर्चा झाली. या भेटीमुळे शिवसेना-भाजप यांच्यात अद्यापही 'विशेष ओलावा' आहे का, असा सवाल नर्माण झाला. राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी एका मुलाखतीत महाविकासआघाडी सरकारचे छान विश्लेषन केले होते. त्याचा सार असा 'महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार टीकावे ही दिल्लीश्वरांचीच इच्छा आहे. कारण महाराष्ट्रात पाच वर्षे कोणीही मुख्यमंत्री राहिले तर तो भविष्यातील पंतप्रधान पदाचा दावेदार राहतो. दिल्लीश्वरांना आणखी पाच वर्षांची संधी कोणाला द्यायची नाही'. यात बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत. राजकारणाची आवड असलेल्या कोणाही व्यक्तीला त्या सहज ध्यानात येतील. (हेही वाचा, Shiv Sena-BJP: ठाकरे-मोदी भेटीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची शिवसेनेला ऑफर 'आम्ही कधीही तयार आहोत')

Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

संजय राऊत यांच्याकडून भाजपचे कौतुक

भाजपशी काडीमोड घेऊन शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सत्तेत आली. त्यानंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. परंतू, शिवसेनेने आजपर्यंत केव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट (व्यक्तीगत) टीका करणे टाळले आहे. शिवसेनेने नेहमीच उघडपणे पंतप्रधान मोदी यांचे व्यक्तीगत पातळीवर कौतुकच केले आहे. जसे की शिवसेना खासदार संजय राऊत परवाच म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप आणि देशातील सर्वोच्च नेते आहेत.' याचाच अर्थ असा की राजकारणात सर्वच दरवाजे बंद करायचे नसतात. गरज पडलीच तर मागे येण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी काही दरवाजे उघडे ठेवायचे असतात. हा त्यातलाच एक प्रकार आहे. (हेही वाचा, Shiv Sena-NCP Alliance: शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस संभाव्य युतीबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य)

File Image Of Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

शरद पवार यांचे शिवसेनेला इतिहास सांगणे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन नुकताच पार पडला. या वेळी बोलताना शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जनतापक्षाचे सरकार सत्तेत असताना इंदिरा गांधी यांना शब्द दिला होता. काँग्रेसला पाठिंबा देण्याचा. तो शब्द पाळत बाळासाहेबांनी एकही उमेदवार त्या वेळी निवडणुकीत उभा केला नव्हता, असे स्मरण करुन दिले. हे म्हणजे शिवसेना सध्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेत आहे. पाच वर्षे एकत्र राहण्याचा शब्द शिवसेनेने दिला आहे. तो शब्द शिवसेना मोडणार नाही, असे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. यात महत्त्वाचे असे की शिवसेना हे भावनेचे राजकारण करणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भावनिक राजकारणाला भावनिकरित्या उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यात भविष्यातील संभाव्य राजकारणाचे सुतोवाच आहे. (हेही वाचा, Shiv Sena-NCP Alliance: शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस संभाव्य युतीबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य)

Sharad Pawar, Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

दरम्यान, राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर नुकतेच शरद पवार यांना भेटले. या आधी त्यांनी भाजपसाठी रणनिती आखण्याचे काम केले होते. नंतर त्यांनी नितीश कुमार, ममता बॅनर्जी आणि दक्षिणेकडील काही राजकीय पक्षांसाठी काम केले आहे. मध्यंतरीच्या काळात ते शिवसेना नेतृ्त्वालाही भेटले आहेत. त्यानंतर शिवसेनेत बरेच बदल झाल्याचे पाहायला मिळाले. आता ते शरद पवार यांना भेटले आहेत. या भेटीचा तपशील अद्याप बाहेर आला नाही. परंतू, तो भविष्यातही बाहेर येईल असे दिसत नाही. आली तर थेट एकादी कृतीच बाहेर येऊ शकेल.