NCP अध्यक्ष शरद पवार घेतायत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा?
Sharad Pawar and Prashant Kishor (Photo Credits: Facebook)

राजकारणाचा सखोल अभ्यास असणारे मातब्बर असे प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर  (Prashant Kishor) यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) भेट घेणार आहे. या भेटीमागची नेमकी काय रणनीती असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मुंबईत ही भेट पार पडत असून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना विजयी केल्यानंतर शरद पवार प्रशांत किशोर यांच्याशी भेट घेत आहेत. या भेटीत भविष्यकाळात राजकारणात काय रणनीती असेल यावर भाष्य केले जाणार आहे. या भेटीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते हे याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.

प्रशांत किशोर यांच्या भेटीत कोणकोणत्या गोष्टींवर चर्चा होऊ शकते?

1. महाराष्ट्राचं राजकारण

शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाराष्ट्राचं राजकीय मॉडेल देशातच अफलातून मानायला हवं. कारण ह्या मॉडेलमध्ये भाजपचा पारंपारिक मित्र असलेला शिवसेना वेगळा होऊन विरोधी विचारसरणीच्या काँग्रेससोबत एकत्र आला. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात चर्चा होऊ शकते.हेदेखील वाचा- Shiv Sena-NCP Alliance: शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस संभाव्य युतीबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य

2. पश्चिम बंगाल ममतांचा विजय

पश्चिम बंगालमध्ये तर ममतांच्या विजयाची जबाबदारीच प्रशांत किशोर यांच्यावर होती. ज्या पद्धतीचं कँपेन भाजपानं पश्चिम बंगालमध्ये राबवलं ते पहाता ममतांचा विजय वाटतो तेवढा सोप्पा नव्हता. पण मग असं काय केलं गेलं की ममतांनी मोदींना मात दिली? बंगाल जो विचार करतो, तो नंतर देश अवलंबतो असं म्हटलं जातं. त्याच मुद्द्यावर चर्चा होऊ शकते.

3. यूपीएचे नेतृत्व कुणी करावं

हा एक मोठा मुद्दा आहे ज्यावर प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात चर्चा होऊ शकते. राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं अशी मागणी काही नेत्यांकडून होत आली आहे. त्यातल्या त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र आल्यापासून ह्या चर्चेनं जोर धरला आहे.

एकूणच प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट महाराष्ट्राच्या राजकारणात खूपच महत्त्वाची ठरू शकते. ज्याचा राज्यातील भविष्यातील राजकारणावर नक्कीच परिणाम झालेला दिसू शकतो.