महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नुकतीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर मोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश आणि भाजपचे अव्वल नेते आहेत, असे संजय राऊत यांनी गुरुवारी सांगितले. संजय राऊत यांना विचारण्यात आले की, आरएसएस राज्य निवडणूकीत राज्यातील नेत्यांना ‘चेहरा’ म्हणून प्रोजेक्ट करण्याच्या विचारात आहे, अशा परिस्थितीत मोदींची लोकप्रियता कमी झाल्याचे वाटते का? त्यावर राऊत यांनी पीएम मोदी हे सर्वात मोठे नेते असल्याचे सांगितले.
या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, ‘मला यावर भाष्य करण्याची इच्छा नाही. मी माध्यमांतल्या अशा बातम्या पाहिल्या नाहीत. यासंदर्भात कोणतेही अधिकृत विधानही झालेले नाही. गेल्या सात वर्षात भाजपाच्या यशाचे श्रेय मोदींना जाते. सध्या ते देशाचे आणि त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत.’ शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्र दौर्यावर आहेत. आज जळगावमधील पत्रकारांशी ते संवाद साधत होते. (हेही वाचा: Shiv Sena-NCP Alliance: शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस संभाव्य युतीबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य)
ते पुढे म्हणाले की, ‘शिवसेनेचा विश्वास आहे की पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे नसून संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी निवडणूक प्रचारात भाग घेऊ नये कारण यामुळे अधिकृत यंत्रणेवर दबाव येत आहे.’ अलीकडेच महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, जर मोदींना हवे असेल तर ते वाघाशी (शिवसेनेचे निवडणूक चिन्ह) मैत्री करू शकतात. यावर राऊत म्हणाले की, 'वाघाशी कुणीही मैत्री करु शकत नाही, वाघ ठरवतो की त्याने कोणाशी मैत्री करायची.’
आपल्या उत्तर महाराष्ट्र दौर्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. महाविकास आघाडीत सहभागी सर्व पक्षांना आपला आधार वाढविणे आणि पक्ष मजबूत करण्याचे अधिकार आहेत. ही काळाची गरज आहे. एकमेकांशी समन्वय साधण्यासाठी आम्ही बैठका घेत आहोत.