Mumbai Warmest January Month: सकाळची थंडी आणि उष्ण दुपारच्या (Hot Afternoons) वातावरणातील कमालीचा परिणाम अलीकडे मुंबईकरांच्या (Mumbai) आरोग्यावर होत आहे. नवीन वर्ष सुरू झाल्यापासून, मुंबईत सातत्याने सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान दिसून येत आहे, जानेवारी 2025 हा आतापर्यंत मुंबई शहराने अनुभवलेल्या सर्वात उष्ण जानेवारी महिन्यांपैकी एक आहे. सोमवारी मुंबईतील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास होते आणि हा पॅटर्न या आठवड्यातही कायम राहण्याचा अंदाज आहे.
सोमवारी, 20 जानेवारी रोजी सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस होते आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअस होते, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) हवामान अहवालात म्हटले आहे. तर आयएमडी मुंबईने शनिवार 25 जानेवारीपर्यंत कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. जर पारा 36 अंश सेल्सिअसवर पोहोचला तर, या वर्षी दुसऱ्यांदा, 2016 नंतरचा शनिवार हा जानेवारीचा सर्वात उष्ण दिवस असेल.
मुंबईत 3 जानेवारीलाही 36 अंश सेल्सिअस तापमान होते. 16 जानेवारी 2006 रोजी मुंबईत आतापर्यंतचे सर्वोच्च जानेवारी तापमान नोंदवले गेले होते. अलीकडे शहरामध्ये सातत्याने उष्णतेचे दिवस पहायला मिळत आहेत, 19 जानेवारी रोजी सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान 34.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, जे सामान्यपेक्षा 3.4 अंश सेल्सिअस जास्त होते आणि किमान तापमान 17 अंश सेल्सिअस होते. तर, कुलाबा वेधशाळेने कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस नोंदवले, जे सामान्यपेक्षा 2.9 अंश जास्त आणि किमान तापमान 21.6 अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा 2.5 अंश जास्त होते.
तर 15 जानेवारी रोजी सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान 35.4 अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा 4.2 अंश सेल्सिअस जास्त होते आणि किमान तापमान 20.3 अंश सेल्सिअस होते जे सामान्यपेक्षा 3.3 अंश जास्त होते.आयएमडीच्या सांताक्रूझ वेधशाळेच्या साप्ताहिक हवामान अंदाजानुसार (20 ते 26 जानेवारी) किमान तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 32 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. पुढील दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील आणि आठवड्याच्या शेवटी आकाश निरभ्र होईल. याबाबत आयएमडी मुंबईचे संचालक सुनील कांबळे म्हणाले, वाऱ्याच्या नमुन्यातील बदलांमुळे हे चढ-उतार होत आहेत. शहरावर सकाळी उत्तरेकडील वारे आणि दुपारी पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव आहे. (हेही वाचा: Mumbai-Pune Expressway Traffic Block: प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक ब्लॉक; जाणून घ्या तारीख, वेळ व पर्यायी मार्ग)
या कमीजास्त तापमानामुळे, विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वासोच्छवासाचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि घराबाहेर थेट संपर्क टाळणे आवश्यक आहे, असे कांबळे म्हणाले. गेल्या महिन्यापासून मुंबईकरांना धुराचे आकाश आणि खराब हवेच्या गुणवत्तेचा सामना करावा लागत आहे. वाढत्या वाऱ्यांमुळे, मुंबईचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 'खराब' श्रेणीवरून 'मध्यम' श्रेणीत सुधारला आहे. सोमवारी मुंबईतील एकूण AQI 'मध्यम' श्रेणीतच राहिला, देवनारमध्ये सर्वात खराब AQI 266 नोंदवला गेला.