मुंबई येथील वांद्र कुर्ला संकुल (BKC) परिसरात असलेल्या जिओ वर्ल्ड सेंटर (Jio World Center Mumbai) परिसरात एक विषारी साप (Venomous Snake) आढळून आला. सुरुवातीला हा साप विषारी असल्याबाबत येथील कर्मचाऱ्यांना कल्पना नव्हती. सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी 'वापरा' या संस्थेला माहिती दिली. प्राप्त माहितीवरुन 'वापरा' या प्राणिमित्र संघटनेसोबत काम करणारे सर्पमित्र अतूल कांबळे जिओ वर्ल्ड सेंटर येथे दाखल झाले. त्यांनी सापाला सुरक्षीतपणे रेस्क्यू केले. त्यानंतर सापाचे एकूण निरिक्षण केल्यानंतर त्यांनी हा साप नाग प्रजातीतील असून तो खूपच विषारी असल्याची माहिती दिली.
सर्पमित्र अतूल कांबळे जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये दाखल होईपर्यंत आजूबाजूच्या नागरिकांना मािती कळली होती. त्यामुळे नागरिकांनी परिसरात मोठी गर्दी केली होती. गर्दी आणि कोलाहाल याची जाणीव झाल्याने साप घाबरला आणि इमारतीलगत असलेल्या कुंडीच्या पाठिमागे लपला. अतुल कांबळे यांनी मोठ्या शताफीने घटनास्थली जाऊन सापाला पकडले. सापाला पकडल्याचे पाहताच कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. काही काळ परिसरात भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हे वातावरण अल्पावधीतच निवळले. (हेही वाचा, World Snake Day 2021: जगातील 'हे' 5 विषारी साप जर चावले तर अवघ्या काही मिनिटात जाऊ शकतो जीव)
रेस्क्यु केलेल्या सापाला वन विभागांच्या नियम आणि कायद्यानुसार नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. सर्पमित्र अतूल कांबळे यांनी माहिती देताना सांगितले की, हा साप नाग प्रजातीचा आहे. सापाची लांबी पाच ते साडेपाच फूल लांब आहे. हा साप चावल्यास आणि वेळीच उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. त्यामुळे सर्पदंश झाल्यास रुग्णाला तातडीने दवाखाण्यात दाखल करणे आवश्यक आहे.
परिसरातील उंदीर, बेडूक, लहान कीटक आणि पक्षांची अंडी हे सापाचे प्रमुख अन्न असते. त्यामुळे अन्नाच्या शोधात साप कधी कधी मानवी वस्तीतही दाखल होतात. अन्न मिळेल त्या ठिकाणी सापाचा अदिवास अधिक जाणवतो. साप हा कधीही स्वत:हून चावा घेत नाही. जेव्हा त्याला लक्षात येते की आपण धोक्यात आहोत. त्यावेळी स्वत:वरील संकट दूर करण्यासाठी तो दंश करतो. असे असले तरी साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. त्यामुळे त्याला मारु नये. अलिकडील काळात सापाच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. काही होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता साप दिसल्यास सर्पमित्रांना कळवावे. पण त्यांना मारु नये, असेही अतूल कांबळे यांनी सांगितले.