Vehicle Horns Sound Levels: आता वाहनांच्या हॉर्नच्या आवाजावरही करडी नजर; मुंबई पोलिसांनी वाहन निर्माता कंपन्यांना केले 'हे' आवाहन
Traffic Cop Mohd Mohsin Sheikh | (Photo Credits: ANI)

रस्त्यावरून प्रवास करताना वाहनांच्या हॉर्नमुळे (Car Horns) अनेकांना खूप त्रास होतो. अनेक लोक विनाकारण हॉर्नचा वापर करत असलेले आपण पाहिले असेल. सिग्नलवर लाल लाईट असतानाही काही वाहन चालक हॉर्न वाजवत राहतात. याबाबत अनेकदा चर्चा होऊनही ठोस पावले उचलली गेली नाहीत. वाहनांच्या हॉर्नमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पावले उचलली आहेत. धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरच्या वापरावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहन उत्पादकांना ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, वाहनांच्या हॉर्नची आवाज मर्यादा कमी करण्याचे आवाहन केले आहे.

पोलीस म्हणाले की, सध्या वाहनांच्या हॉर्नचा आवाज 92 ते 112 डेसिबलपर्यंत आहे, जे न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे. त्यांनी पुढे सांगितले, ‘आम्ही नुकतीच वेगवेगळ्या ऑटोमोबाईल उत्पादकांसोबत बैठक घेतली आणि त्यांना ध्वनी प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी वाहनांच्या हॉर्नचा आवाज कमी करण्यास सांगितले,’ वाहनचालकांकडून मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणाऱ्यांवरही शहर पोलीस कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषत: रात्रीच्या वेळी हॉर्नच्या आवाजाचीही चौकशी केली जाणार आहे.

महानगर ध्वनीप्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने पोलीस वाहन विक्रेत्यांचीही बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी नुकतीच विविध बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचीही भेट घेतली होती आणि त्यांना बांधकाम कामामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले होते, जेणेकरून लोकांना त्यांचा रविवार शांततेत घालवता येईल.

दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर आणि त्यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ठाकरे यांनी मशिदींच्यावरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर ज्या मशिदींवर लाऊडस्पीकर चालू होते त्या ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. आता महाराष्ट्रासह देशभरात लाऊडस्पीकर वापरण्याबाबत वाद सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनंतर अनेक नेते वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. मुख्य मुद्द्यापासून विचलित होऊन विविध पक्षांचे नेते त्याला वेगवेगळे रंग देऊन भाषणबाजी करत आहेत.