राजधानी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात दोन नेत्यांच्या भेटीची जोरदार चर्चा सुरु आहे. या भेटीने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. ही भेट आहे शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप (BJP) खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांच्यातील. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तीन तास चर्चा झाली. ही भेट संजय राऊत यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी मंगळवारी रात्री (29 मार्च) रोजी झाली. राहुल गांधी यांनी वरुण यांना भोजनासाठी निमंत्रीत केले होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये 'डिनर डिप्लोमसी' झाली. या भेटीचे राजकीय वर्तुळात आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. भेटीचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.
शिवसेना आणि भाजप हे एकमेकांचे काही वर्षांपूर्वीचे मित्र. दोन्ही पक्ष परस्परांसोबत 25 वर्षे युतीत राहिले. 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र ही युती तुटली. युती तुटल्यावर दोन्ही पक्षामध्ये इतकी कटुता आली की, आजकाल असा एकही दिवस जात नाही की, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका केली नाही. केंद्रातही शिवसेना खासदार भाजपवर संसदेमध्ये दररोज प्रहार करत असतात. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार वरुण गांधी आणि संजय राऊत यांच्यात झालेल्या भेटीने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
पाठिमागील काही काळापासून वरुण गांधी हे भाजपवर नाराज असल्याचे स्पष्ट दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही वरुण गांधी हे काहीसे अलिप्त पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनातही ते भाजप आणि नेतृत्वावर सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार हल्ले करत होते. त्यामुळे वरुण गांधी यांच्या मनात काही वेगळेच आहे का? अशीही चर्चा सुरु आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या भेटीला महत्त्व आले आहे. वरुण गांधी हे उत्तर प्रदेशमधील पिलभीत येथून भाजपचे खासदार आहेत.