मुंबईमध्ये बीएमसीकडून (BMC) सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला मोठा वेग आला आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना व्हायरसच्या संसर्गाविरूद्ध लसीकरण करण्याच्या हेतूने, बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोमवारी एचआयव्ही रुग्ण, सेक्स वर्कर्स, स्थलांतरीत कामगार, रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम कामगारांचे लसीकरण करण्यासाठी चार मोबाईल कोविड-19 लसीकरण युनिट सुरू केले. 'व्हॅक्सिन ऑन व्हील्स' (Vaccine on Wheels) असे या उपक्रमाचे नाव असून, त्याला अमेरिकन इंडिया फाउंडेशनने लसीकरण करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. याद्वारे ज्यांचे अद्याप लसीकरण झाले नाही त्यांना लस दिली जाणार आहे.
हा उपक्रम अतिरिक्त महापालिका आयुक्त (आरोग्य) सुरेश काकणी यांनी सुरू केला. पहिल्या दिवशी कमीतकमी 50 स्ट्रीट विक्रेते आणि 25 सेक्स वर्कर्स यांना लस देण्यात आली. बीएमसी अधिकाऱ्याचा हवाला देत टाइम्स ऑफ इंडियाने सांगितले आहे की, बीएमसीने ज्यांना लस द्यायची अशा समाज घटकांची यादी तयार केली आहे. यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी, पथ विक्रेता संघटना आणि इतर स्वयंसेवी संस्थांकडून मदत मागण्यात आली.
प्रत्येक मोबाईल युनिटमध्ये एक प्रशिक्षित डॉक्टर, दोन परिचारिका, दोन वैद्यकीय सहाय्यक आणि रुग्णवाहिका चालक असतील. त्यांना लॅपटॉप आणि वायफाय सुविधा दिली जाईल जेणेकरून ते कोविन पोर्टलवर नोंदणी करू शकतील आणि लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देऊ शकतील. आवश्यकतेनुसार पुढे अशा मोबाईल केंद्रांची संख्याही वाढवली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईतील घरोघरी लसीकरण मोहिमेअंतर्गत बीएमसीने आतापर्यंत 40 टक्के लाभार्थ्यांचे कोरोनाचे लसीकरण केले आहे. बीएमसीने हे लसीकरण फक्त 6 दिवसात पूर्ण केले आहे. या लसीकरणात बीएमसीने एका खासगी संस्थेचे सहकार्य घेतले आहे. याला आणखी चालना देण्यासाठी बीएमसी रोडमॅप तयार करत आहे. (हेही वाचा: Aurangabad येथे आरोग्य कर्मचाऱ्याकडून Covid-19 लसीचा काळाबाजार; 300 रुपयांना दिले जात होते डोस)
मुंबईमधील अंथरुणाला खिळलेले रुग्ण आणि हलण्यास असमर्थ असलेल्या लोकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी, बीएमसीने 2 ऑगस्टपासून त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यास सुरुवात केली.